पीओपी गणेश मूर्त्यांऐवजी पर्यायाची चाचपणी;मूर्तिकार संघटनांसह तज्ज्ञांना साद; १० दिवसांत माहिती सादर करा

पर्यावरणास हानिकारक पीओपीच्या गणेश मूर्त्यांऐवजी नवीन पर्याय, मुर्त्यांमधील प्रदूषणकारी घटक कमी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तिकार संघटनांसह तज्ज्ञांना साद घातली आहे.
पीओपी गणेश मूर्त्यांऐवजी पर्यायाची चाचपणी;मूर्तिकार संघटनांसह तज्ज्ञांना साद; १० दिवसांत माहिती सादर करा

मुंबई : पर्यावरणास हानिकारक पीओपीच्या गणेश मूर्त्यांऐवजी नवीन पर्याय, मुर्त्यांमधील प्रदूषणकारी घटक कमी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तिकार संघटनांसह तज्ज्ञांना साद घातली आहे. पीओपीच्या गणेश मूर्त्यांऐवजी नवीन पर्याय असल्यास पुढील १० दिवसांत माहिती सादर करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तिकार संघटनांसह तंज्ज्ञांना केले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेश मूर्तीं या पर्यावरणास हानीकारक असून समुद्रात विसर्जन केल्यावर समुद्र जीवाला धोका निर्माण होतो. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी २००८ मध्ये लागू केली आहे. तर केंद्र व राज्य सरकारने यावर मार्गदर्शक सूचना जाहीर करा, असे निर्देश दिले होते. मुर्ती कशा प्रकारे बनवावी, विसर्जन कशा प्रकारे करावे याबाबत केंद्रीय पर्यावरण प्रदूषण मंडळाने २०१० मध्ये नियमावली जाहीर केली. परंतु मुंबईत एकदम पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घालणे शक्य होत नसल्याने टप्याटप्याने पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी गणेश मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक व शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्य सरकार, एमपीसीबी व पालिकेकडून गणेश मूर्तिकारांना वेळोवेळी करण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याच्या अनुषांगाने शासनास शिफारशी करण्यासाठी २४ जुलै रोजीच्या शासन निर्णय क्रमांक : याचिका- २०२२/प्र.क्र.२०/तां. क. ३ अन्वये मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्य अध्यक्षतेखाली एक तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्लास्टर ऑफ पॅरीस (पिओपी) मुर्त्यांच्या ऐवजी उपलब्ध पर्यायांच्य अवलंब करणे तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस (पिओपी) मुर्त्यांमधील प्रदूषणकारक घटक कमी करणे, याबाबतची पडताळणी करणे व प्रदूषण कमी करुन पर्यावरणपूरक पद्धतीन सण साजरे करण्याबाबत उपाय योजनांची/ विविध पर्याय शोधणे अश्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी मुर्त्यांच्या वापराऐवजी विविध पर्याय, अथवा या बाबत संशोधन करणारे तज्ज्ञ व्यक्ती, संशोधक संस्था, संशोधक, मूर्तीकार, मूर्तीकार संघटना, तांत्रिक संस्था, तांत्रिक प्रयोगशाळा आदींकडे कोणतेही पर्याय, नवीन पर्यायाचा अभ्यास, प्रयोग निरीक्षणे असल्यास संबंधीतांनी पुढील १० दिवसांच्या आत expertganesh24@gmail.com या ई-मेल आयडीवा पाठवावी, असे आवाहन एमपीसीबीचे केले आहे.

यंदा ७ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन

यंदा २०२४ मध्ये ७ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाची घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे बाप्पाची मूर्ती साकारणाऱ्या मुर्तीकारांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती साकाराव्यात जेणे करुन पीओपी गणेश मूर्त्यांऐवजी गणेश भक्त पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतील. पीओपीच्या गणेश मूर्त्यांऐवजी नवीन पर्याय उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापासून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in