ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा ; सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप

शिवसैनिकांची जामिनावर सुटका झाल्‍यानंतर त्‍यांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा ; सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप

गणेशोत्‍सवाची सांगता होत असतानाच शनिवारी रात्री शिवसेनेचा गड मानल्‍या जाणाऱ्या दादर प्रभादेवी विभागात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी परस्‍परविरोधी आरोप केले असून, याप्रकरणी ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती, तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असून त्‍यांना अटक करण्याची मागणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली आहे. “सरकारपुरस्‍कृत गुंडागर्दी जर अशीच चालू राहिली तर जुनी शिवसेना काय आहे, हे आम्‍ही दाखवून देऊ,” असा इशाराही अरविंद सावंत यांनी दिला आहे. आमदार सदा सरवणकर यांनी हा प्रकार म्‍हणजे जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्‍न असल्‍याचे म्‍हटले आहे; मात्र त्यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्‍यान, अटक झालेल्‍या शिवसैनिकांची जामिनावर सुटका झाल्‍यानंतर त्‍यांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले. दादर विभागात गणेश विसर्जनावेळी झालेल्‍या किरकोळ वादाचे पर्यावसान शनिवारी रात्री जोरदार राड्यात झाले. यानंतर परस्‍परविरोधी आरोप करण्यात आले.

आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी स्‍वतःच्या बंदुकीतून गोळीबार केल्‍याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. तर शिंदे गटाच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. रविवारी सकाळी शिवसेनानेते खासदार अरविंद सावंत, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब तसेच अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात ठाण मांडत आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गोळीबार केल्‍याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, तसेच अटक केलेल्‍या शिवसैनिकांना तत्‍काळ जामीन द्यावा, अशी मागणी केली; अन्यथा पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. “आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला; मात्र ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या म्‍हणीप्रमाणे तक्रार दाखल करायला आलेल्‍या शिवसैनिकांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारपुरस्‍कृत ही गुंडागर्दी अजिबात सहन केली जाणार नाही. कधी विरोधकांना संपवण्याची भाषा करण्यात येते. कधी ‘चुन चुन के मारेंगे’ बोलतात. कोणी तंगड्या तोडण्याची भाषा करतात. राज्‍यातील कायदा-सुव्यवस्‍था बिघडवण्याचे प्रयत्‍न सरकारकडून सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसैनिक शांत आहेत. राज्‍यातील वातावरण बिघडू नये, अशीच आमची इच्छा आहे; मात्र जर हे प्रकार असेच सुरू राहिल्‍यास, जुनी शिवसेना काय आहे हे आम्‍ही दाखवून देऊ,” असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला.

या वादाप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यावर प्रतिक्रिया देताना सदा सरवणकर म्‍हणाले, “आपण गोळीबार केलेला नाही. आपल्‍यासोबत स्‍टेनगनधारी पोलीस असताना मला हातात पिस्तूल घेण्याची गरजच काय? हा मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्‍न आहे. शिंदे गटात गेल्‍याने हे षड‌्यंत्र रचण्यात येत आहे.

आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. पोलिसांवर दबाव आणून कोणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्‍याचा तपास करतील. मी कामाने मोठा झालो आहे, भांडणे करून नाही.

भविष्‍यात असे वाद नको, यासाठी प्रयत्‍न करायला हवेत. पोस्‍टर फाडून, दगडफेक करून माझे काम संपवता येणार नाही. असे प्रकार करण्यापेक्षा एकमेकांना कामाने जिंकू,” असेही सदा सरवणकर म्‍हणाले.

उद्धव ठाकरेंकडून ‘त्‍या’ शिवसैनिकांचे कौतुक

जामीन मिळालेल्‍या पाच शिवसैनिकांना घेऊन विभागप्रमुख महेश सावंत रविवारी दुपारी मातोश्रीवर आले. त्‍यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्‍य ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना महेश सावंत म्‍हणाले, “उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना संयम बाळगण्याचा सल्‍ला दिला आहे. आपल्‍याला कोणाशी मारामारी करायची नाही, तर पक्ष वाढवायचा आहे. उद्धव ठाकरे आमचे गुरू असून त्‍यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in