ठाकरे बंधूंची युती आज! मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव-राज यांचा ‘ठाकरे ब्रँड’ सज्ज

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर आता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज (दि. २४) दुपारी १२ वाजता होणार असल्याचे माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
ठाकरे बंधूंची युती आज! मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव-राज यांचा ‘ठाकरे ब्रँड’ सज्ज
Photo : X (sanjay raut)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंची युती कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर आता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज (दि. २४) दुपारी १२ वाजता होणार असल्याचे माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वारंवार वाढल्या असून कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती वाढली आहे. त्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू लवकरच राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत होते. आता खुद्द शिवसेनेची बुलंद तोफ समजले जाणारे संजय राऊत यांनीच युतीसंदर्भात सूतोवाच केले आहे. संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरेंचा पुष्पगुच्छ देतानाचा फोटो शेअर केला आहे. “उद्या १२ वाजता” अशा एकच वाक्यात राऊतांनी युतीचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या फोटोसह ही वेळ दिली असल्यामुळे बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.

मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागावाटप पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी काही जागांवरून तिढा कायम असल्याचे कळते. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मंगळवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जागावाटपाची प्रक्रिया अनावश्यक ताणून धरू नका. ती लांबवू नका, असे सांगितले होते. मातोश्रीवर मंगळवारी मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यावेळी शिवडी आणि दादरमधील जागावाटपाचा तिढा पार पडला होता. परंतु, भांडुप, विक्रोळी आणि पश्चिम उपनगरातील काही जागांवरून ठाकरे गट आणि मनसे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेतील इच्छुक उमेदवारांचे पक्षाकडून मिळणाऱ्या ‘एबी फॉर्म’कडे लक्ष लागले आहे. युतीची घोषणा लवकरात लवकर झाल्यास, एबी फॉर्म वितरणाला सुरुवात होईल आणि उमेदवारांनाही प्रचार करण्यास वेळ मिळणार आहे.

“शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनीच स्वीकारली आहे. कोणाच्याही मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेले असून जागावाटपावर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला. युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली,” असेही संजय राऊत यांनी सांगितले.

काँग्रेसचा विषय बंद - संजय राऊत

मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरेंसोबत जयंत पाटलांची चर्चा सुरू आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्यामुळे त्यांचा विषय आम्ही बंद केला आहे. आम्हाला त्यांची काही ठिकाणी मदत लागली तर त्यांच्याशी नक्कीच चर्चा करू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

ठाकरे सेनेला १५०, मनसेला ६०-७० जागा

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीला २४ डिसेंबरचा मुहूर्त मिळाला असून त्यांचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार मुंबईतील एकूण २२७ प्रभागांपैकी शिवसेना ठाकरे गटाला १४५ ते १५० जागा मिळणार आहे. मनसेच्या वाट्याला ६५ ते ७० जागा येण्याची शक्यता आहे, तर ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी १० ते १२ जागा सोडण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाने २०१७च्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या हक्काच्या १२ ते १५ जागा मनसेसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी निवडून आलेले उमेदवार शिंदे गटाने फोडल्याने ठाकरे गटाला तिथे तगडा उमेदवार सापडत नाही. त्याउलट मनसेकडे मात्र चांगले उमेदवार असल्याने उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in