भाच्याचा साखरपूडा निमित्त ठरणार? एकत्र आले राज आणि उद्धव ठाकरे; भेट घेत केली एकमेकांची विचारपूस

या कौटुंबिक समारंभात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांची विचारपूसही केली.
भाच्याचा साखरपूडा निमित्त ठरणार? एकत्र आले राज आणि उद्धव ठाकरे; भेट घेत केली एकमेकांची विचारपूस
PM
Published on

मुंबई : भाऊ म्हणून व्यक्तिगत अडीअडचणीत एकमेकांना मदत करत असले तरी राज्याच्या राजकारणात कायम एकमेकांसमोर उभे ठाकणारे ठाकरे बंधू शुक्रवारी एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकाच फ्रेममध्ये पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांना आनंद झाला असल्यास नवल नाही. निमित्त होते राज ठाकरे यांचे भाचे यश देशपांडे यांचा साखरपुडा. यानिमित्ताने दोघे ठाकरे बंधू एकत्र आले होते. कौटुंबिक सोहळ्याला हजर राहून उद्धव ठाकरे यांनी भाच्याला आणि नवीन होणाऱ्या सुनेला आशीर्वाद दिले.

ठाकरे बंधूंनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावे, यासाठी अनेकांनी मागणी केली होती. शिवसेना तसेच मनसेतल्या काही नेत्यांनीही तशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, दोघा भावांनी यावर काहीही बोलायचे टाळले. आधी काहीवेळा टाळी देण्याचा प्रयत्न झालाही, मात्र तो यशस्वी झाला नाही. अगदी परवाच्या धारावी प्रकरणापर्यंत दोघांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडायचे काही सोडले नाही. पण, शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरे पत्नी रश्मी यांच्यासह राज ठाकरेंकडे गेले. निमित्त होते कुटुंबातल्या साखरपुडा समारंभाचे. राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांचा साखरपुडा होता. त्याच निमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.

या कौटुंबिक समारंभात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांची विचारपूसही केली. रश्मी ठाकरे व शर्मिला ठाकरे यांचीही भेट झाली. उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मातोश्रींशी देखील संवाद साधला. राज्याच्या राजकारणात आता फारच बदल झाला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे या मागणीनेही उचल खाल्ली होती. मात्र, दोघांकडून तसे काहीच संकेत देण्यात आलेले नाहीत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तसे काही होईल अशी शक्यताही नाही. मात्र, कौटुंबिक समारंभासाठी का होईना दोन्ही बंधू एकत्र आल्याचे पाहून निश्चितच दोघांच्याही समर्थकांना आनंद झाला असेल. दरम्यान, भाच्याचा साखरपूड्याच्या निमित्ताने दोन्ही भावांमधील कटूता कमी होऊन राजकारणातही एकत्र येणार का? अशी चर्चा दोघांच्या समर्थकांमध्ये सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in