

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. या सोसायटी निवडणुकीत मराठी च्या मुद्द्यावर एकत्र आलेले आणि मराठी अस्मितेचा स्वाभिमान असलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिकेत सत्ता येऊ शकते अशी चर्चा असताना हे दोन्ही बंधू बेस्ट कामगारांच्या पाटपेढीच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.
बेस्ट चे बहुतांश कामगार पुढारी, युनियन चे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. बेस्ट पतपेढी ची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकी ची नांदी आहे. त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधूच्या युतीला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या मध्ये या युती बाबत मागील काही दिवसा पासून चर्चा सुरु होती. वरिष्ठाच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्ट मधील प्रत्येक लढाई बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्दव ठाकरे सरकारच्या काळात ग्रॅज्युएटीसाठी मुंबई महापलिका प्रशासन नियमित मदत करत होते. परंतु जून २०२२ नंतर महायुती सरकार भाजप सत्तेत आल्या नंतर बेस्ट मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढत चालली आहे. बेस्टचा स्व मालकीचा बसताफा कमी होत चालला आहे. नवीन नोकर भरती नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
ठाकरे एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाची एकजूट
बेस्ट उपक्रमाने मराठी माणसाना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पण विद्यमान सरकार मधील पुढारी आणि त्यांची धोरण काही उद्योगपतीना बेस्ट आंदण देण्यासाठी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे बेस्ट मधील मराठी कामगार हद्दपार होत चालला आहे त्यामुळे बेस्ट मध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाची एकजूट मोठया ताकदीने उभी राहणार यांत शंका नाही. असे युनियनचे कार्यकर्ते सांगतात.