
मुंबई : मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु मुंबई महापालिका निवडणुक जाहीर होण्याधीच बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत मनसे-उद्धव ठाकरे सेना एकत्र रिंगणात उतरल्या आहेत. मनसे-उद्धव ठाकरे सेना एकत्र आल्याने बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत पाच संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
८४ वर्षांचा इतिहास असलेल्या या पतसंस्थेवर उबाठा सेनेचे संचालक मंडळ गेली ९ वर्षे कार्यरत होते. या काळात या संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अनेक सभासदांनी सोसायटीचे राजीनामे दिले. परिणामी यांच्या कार्यकाळात सोसायटीच्या सभासदांची संख्या निम्म्यावर आली.
“अ” श्रेणीमध्ये असलेली सोसायटीची श्रेणी घसरून गेली ४ वर्षे “ब” श्रेणीमध्ये आलेली आहे. उबाठा सेनेने बेस्ट उपक्रमावर ३५ वर्षे राज्य करून बेस्ट उपक्रमाला हलाखीच्या परिस्थितीत आणले. तीच परिस्थिती बेस्ट कामगारांच्या सोसायटीची केली आहे. त्यामुळे सोमवार, १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच संघटनांची वज्रमूठ सहकार समृद्धी पॅनल हे बेस्ट क्रेडिट सोसायटीला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी उभे ठाकलेले आहे.
संघटना मैदानात
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बेस्ट कामगार सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्या असून त्यांच्या युतीच्या पॅनलविरुद्ध आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना (शिवसेना-शिंदे गट), महेंद्र साळवे यांची बेस्ट
एसी/एसटी/व्हीजेएनटी वेल्फेअर असोसिएशन व कै. मनोज संसारे यांचा बहुजन संघ अशा पाच संघटनांनी मिळून केलेले सहकार समृद्धी पॅनल तयार करण्यात आले आहे. पाचही संघटनांनी बेस्ट क्रेडिट सोसायटीत सत्ताधारी उबाठा सेनेच्या संचालक मंडळाच्या कारभाराविरुद्ध एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे.