ठाकरे सरकारचा पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय

ठाकरे सरकारचा पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय
Published on

केंद्र सरकारने शनिवारी अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्यानंतर राज्य सरकारनेदेखील करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयानंतर पेट्रोल २ रुपये ८ पैसे, तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे महागाईत होरपळणाऱ्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्राने कर कमी केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून करण्यात येत होती. जनतेच्या या मागणीला अनुसरून ठाकरे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (वॅट) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा मोठा निर्णय शनिवारी जाहीर केला. पेट्रोलचा दर ९.५० पैसे आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनीदेखील कर कमी करावेत, असे आवाहन सीतारामन यांनी केले होते.

इंधनावरील मूल्यवर्धित कर कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे, राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न बुडणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रति लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

logo
marathi.freepressjournal.in