तपास यंत्रणा पाठ सोडेनात! चौकशीचा ससेमिरा ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी

निकाल नेमका काय लागतो, याबद्दल दोन्ही गटांत धाकधूक आहे.
तपास यंत्रणा पाठ सोडेनात! चौकशीचा ससेमिरा   ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी

विशेष प्रतिनिधी/मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या फार्मात असून, इनकमिंग जोरात सुरू आहे. मूळ शिवसेनेतील नेते, कधी पदाधिकारी, कार्यकर्ते थेट शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्क्यावर धक्के बसत आहेत. परंतु उद्धव ठाकरे पक्षाची नव्याने बांधणी करीत जशास तसे प्रत्युत्तर देत आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या खच्चीकरणावर लक्ष केंद्रित करून अनेक आमदारांवर चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यामध्ये रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब आदी आमदारांचा समावेश आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर उफाळून आलेला वाद आणि पक्ष, चिन्हाची मालकी आणि आमदार अपात्रता या मुद्याभोवतीच गेल्या वर्षभरापासून राजकारण फिरत राहिले आहे. त्यातच आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. आता दि. १० जानेवारी रोजी आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होणार आहे.

निकाल नेमका काय लागतो, याबद्दल दोन्ही गटांत धाकधूक आहे. एकीकडे ही धाकधूक सुरू असतानाच ठाकरे गटातील आमदारांच्या चौकशीचा ससेमिराही सुरू झालेला आहे. यामध्ये रवींद्र वायकर यांचा समावेश असून, मंगळवारी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने सकाळी धाडी टाकल्या. वायकर यांचे मातोश्री क्लब, निवासस्थानासह ४ ठिकाणी ईडीने छापे टाकले. वायकर यांच्यावर जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता आणि जोगेश्वरी येथील हॉटेलसंदर्भात ही तक्रार होती. मुंबई मनपाच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले. त्यांनी महापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती. हा ५०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या प्रकरणी वायकर यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानुसार या धाडी टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वायकर यांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान काही कागदपत्रे सापडतात का, यासाठी कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली.

आमदार साळवी यांच्या कुटुंबीयांची आज चौकशी

बुधवारी (१० जानेवारी) दुपारी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे. एकीकडे यावर सर्वांची नजर असतानाच ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांचीही अलिबाग येथील एसीबीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. या चौकशीला साळवी यांचे बंधू आणि पुतणे उपस्थित राहू शकतात. त्यांच्यासोबत स्वत: आमदार राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अन्य सदस्यांचीही चौकशी होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in