आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार!

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरेंना शिंदे फडणवीस घेरण्याचा तयारीत असून उद्धव ठाकरे नागपुरात जाणार
आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार!
Published on

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्याच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशी करणार असल्याचे आदेश दिले. त्यानंतर हिवाळी अधिवेशात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आता सोमवारपासून पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होणार असून शिंदे-फडणवीस सरकार आदित्य ठाकरेंना या प्रकरणात घेरण्याचा तयारीत असणार आहेत. अशामध्ये आता मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह युवासेना सचिव वरुण सरदेसाई नागपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे लोकसभेत म्हणाले होते की, "सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला एयू नावाचे ४४ फोन आले होते. बिहार पोलिसांनी तपास केला असता तो नंबर एयू म्हणजे आदित्य उद्धव असा नावाचा अर्थ येत होता." यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in