ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा ; मुंबई महापालिका स्वतंत्र लढण्याच्या तयारीत ?

उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही निवडणूक राष्ट्रवादीसोबत युती करून लढवण्याच्या मनस्थितीत आहे. अशात नेत्यांनी विरोधाची भूमिका
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा ; मुंबई महापालिका स्वतंत्र लढण्याच्या तयारीत ?

अभिजित मुळ्ये/मुंबई

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी आपण स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाऊ या, असा आग्रह धरला असल्याचे समजते. निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीत अद्याप एकमत झालेले नाही. कॉँग्रेसने अगोदरच स्वबळाचा राग आळवला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही निवडणूक राष्ट्रवादीसोबत युती करून लढवण्याच्या मनस्थितीत आहे. अशात नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे २९ आणि १४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २२७ सदस्यांच्या सभागृहात १०० जागांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदार पूर्णपणे भिन्न आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या पक्षांशी आघाडी केली तरीही कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारसरणीचे मतदार मतदान करण्याची शक्यता नाही, असे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांना वाटते. मुंबईत प्रामुख्याने मतदारांची मराठी, हिंदु आणि दलित-मुस्लिम अशी तीन गटांत विभागणी केली जाते. शिवसेना आतापर्यंत मराठी आणि हिंदु मतदारांच्या जीवावर निवडणुका जिंकत आली आहे. २०१२ मध्ये रामदास आठवले यांना सोबत घेत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला. दलित मतदार शिवसेनेकडे वळलाच नाही.

हा अनुभव पाहता काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रयोग नको, अशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांचे म्हणणे आहे, अन्यथा मराठी- हिंदु मतदारांपुढे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच मनसे हे पर्याय उभे राहतील. त्याचा मोठा फटका बसू शकतो. या निष्कर्षावर हे नेते आले आहे. उद्धव ठाकरे सध्या परदेशात आहेत. ते परतल्यानंतर या अधिक तपशीलवार चर्चा होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in