

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) आणि मनसेने शहर आणि उपनगरातील मराठी भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. मराठीबहुल विभागांमध्ये मतांचे विभाजन आणि पराभव टाळण्यासाठी जागा वाटपामध्ये जिंकणाऱ्या जागांवर तडजोडीची भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली आहे. महापालिकेत अधिकाधिक जागा जिंकण्याची रणनीती दोन्ही पक्षांकडून आखण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. काँग्रेसने स्वबळाची नारा दिल्याने महायुतीसाठी निवडणूक सोपी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यातच मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यासह मुंबईतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. उबाठा गटातील बहुतांश नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने यामध्येही निवडणुकीत मराठी मते विभागणार आहेत. सोबतच भाजप, काँग्रेस या पक्षांना मानणारा मराठी वर्गही मोठा असल्याने अधिकाधिक मराठी मते मिळवण्यासाठी मनसे आणि उबाठा गटाने तयारी सुरू केली आहे. त्या दिशेने दोन्ही पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे.
वरळी, दादर, लालबाग-परळवर अधिक लक्ष
तिकीट वाटपामध्ये जिंकणारे उमेदवार पाहून तिकीट वाटप करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वरळी, लालबाग,परळ, दादर, माहीम अशा वर्चस्व असलेल्या शहर आणि उपनगरातील ठिकाणांवरही लक्ष्य केंद्रित केले आहे. अधिकाधिक जागा कशा पदरात पडतील, यासाठी दोन्ही पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. दरम्यान, धारावीतील १८८ मतदारसंघांत मनसेची ताकद नसताना उमेदवारी देण्यात येत असल्याबद्दल पक्षातील नेत्यांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भांडुप, विक्रोळीवरून कोंडी कायम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात काही जागांवर अजूनही कोंडी कायम आहे. मनसेच्या एका नेत्याने सांगितले की ही कोंडी विशेषतः भांडूपमधील प्रभाग क्रमांक ११४ वर आहे. पूर्व उपनगरातील भांडूप आणि विक्रोळी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांचे बळकट गड मानले जातात. मनसेही प्रभाग क्रमांक ११४ वर दावा केला आहे तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून एका माजी आमदारांची पत्नी तसेच खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजूल पाटील या प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या प्रभागात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय असून दोन्ही पक्षांना येथे सहज विजयाची अपेक्षा आहे. या प्रभागाबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला २२७ जागांपैकी ८४, भाजपला ८२ तर मनसेला सात जागा मिळाल्या होत्या.
जागा वाटपाचा तपशील गुलदस्त्यात
ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकांपूर्वी युती करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी जागावाटपाबाबतचे तपशील त्यांनी उघड केले नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा जागा वाटपाचा हा तिढा एक दोन दिवसात सोडवला जाईल, अशी माहिती मनसे नेत्याने दिली.