
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पक्षपातीपणे वागत असल्याचे सिद्ध होत आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या नावांची यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. तसे केल्यास पुन्हा एकदा कोर्टात जाऊ,” असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना यादी पाठवली होती; मात्र आता सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना ही यादी रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला विरोध
अंबादास दानवे म्हणाले, “हे प्रकरण कोर्टात गेले होते. लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत कोर्ट राज्यपालांना निर्देश देऊ शकत नव्हते; मात्र तशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे ती यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. दोन वर्षे त्यांनी ही यादी प्रलंबित ठेवली. ही यादी रद्द करता येणार नाही. हा कॅबिनेट निर्णय होता. आम्ही न्यायालयात जाऊ. जे जे काही करता येईल ते आम्ही करू,” असा इशारा त्यांनी दिला.