ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांना सीबीआय कोर्टाचा दिलासा

श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे धाकटे भाऊ आहेत
 ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांना सीबीआय कोर्टाचा दिलासा

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनीलाँड्रिंग व फसवणूक प्रकरणात सीबीआय कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ८४.६ कोटींच्या या गैरव्यवहारप्रकरणी पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील तपास बंद करावा, असा क्लोजर अहवाल सीबीआयने विशेष सीबीआय कोर्टात सादर केला होता. हा अहवाल कोर्टाने स्वीकारला, याचाच अर्थ या प्रकरणी तपास थांबवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे धाकटे भाऊ आहेत.ते गृहनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असून त्यांची साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून पाटणकरांनी मनीलाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या हमसफर डीलर या कंपनीने पाटणकरांच्या कंपनीला ३० कोटी रुपये कर्ज दिले होते; मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचा ईडीचा आरोप आहे. या पैशातूनच ठाण्यात गृहनिर्मिती प्रकल्प राबवण्यात आल्याचा आरोप करत ईडीने २०१७ मध्ये पाटणकरांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पाटणकर यांच्या कंपनीच्या ११ सदनिकाही इडीने जप्त केल्या आहेत.

पाटणकर यांच्याविरोधातील मनीलाँड्रिंग प्रकरणात ईडी व सीबीआय या दोन्ही केंद्रीय संस्था तपास करत आहेत. विशेष म्हणजे सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला ईडीने विरोध केला आहे. तर, या प्रकरणात पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले नाहीत, असे कारण देत सीबीआयने यापूर्वी २०२० मध्येही कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र, न्यायालयाने तेव्हा हा रिपोर्ट फेटाळून लावला होता. २ वर्षांनंतर सीबीआयने पुन्हा क्लोजर रिपोर्ट सादर केल्याने कोर्टाने तो स्वीकारला आहे. मात्र, ईडीने या अहवालाला विरोध केला असून पाटणकर यांच्याविरोधात ईडीचा तपास सुरुच राहणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in