

मुंबई : ठाणे ते बोरीवली दरम्यानची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित भुयारी मार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने आर्थिक पाठबळ दिले आहे. प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सरकारने १५३ कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी राज्य सरकारने यापूर्वी २ हजार ४१७ कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. या निधीमध्ये केंद्रीय कराच्या ५० टक्के रकमेपोटी ५७२.३० कोटी रुपये, राज्यस्तरीय करांसाठी १ हजार १४४.६० कोटी रुपये तसेच खासगी आणि शासकीय जमीन कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून घेण्यासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या एकूण मंजूर निधीपैकी चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीतून १५३ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार आता या रकमेच्या वितरणास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या भुयारी मार्गामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरातील वाहतूककोंडी कमी होणार आहे.
टप्प्याटप्प्याने आर्थिक साहाय्य मिळणार
ठाणे आणि बोरिवली दरम्यानच्या प्रवासासाठी सध्या घोडबंदर मार्गाचा वापर केला जातो. या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने भुयारी मार्गाचा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.