ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाणे-नवी मुंबईत ताणतणाव; महाविकास आघाडीत जागेचा पेच कायम

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी ठाणे आणि नवी मुंबईतील महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद तीव्र झाले आहेत.
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाणे-नवी मुंबईत ताणतणाव; महाविकास आघाडीत जागेचा पेच कायम
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाणे-नवी मुंबईत ताणतणाव; महाविकास आघाडीत जागेचा पेच कायम(संग्रहित छायाचित्र)
Published on

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी ठाणे आणि नवी मुंबईतील महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद तीव्र झाले आहेत. उद्धव सेना आणि मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच अन्य घटक पक्षांना अपेक्षित जागा मिळण्यात अडचणी येत असून, मॅरेथॉन बैठका होऊनही अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. जागावाटपाच्या सूत्रावर एकमत न झाल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत तणाव वाढत चालला असून, पुढील काही दिवसांत होणाऱ्या बैठका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

ठाण्यात स्थानिक नेत्यांमुळे तिढा कायम

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असले, तरी त्याचा थेट परिणाम आता ठाण्यातील महाविकास आघाडीवर होताना दिसत आहे. ‘आम्ही सांगू त्या जागाच मिळतील,’ अशी भूमिका उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही.

ठाण्यातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा मोठा पक्ष असतानाही समाधानकारक जागा मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. उद्धव सेना आणि मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासह काँग्रेसलाही अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

मागील काही दिवसांपासून ठाण्यात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून, जागावाटपाच्या सूत्रावर अद्याप एकमत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा होऊनही जागावाटपाचे गुऱ्हाळ सुटले नाही. बुधवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

बैठकीत उद्धव सेनेचे सध्या केवळ तीन नगरसेवक असतानाही त्यांनी ५० ते ५५ जागांवर आपला दावा कायम ठेवला. मनसेला ३० ते ३२ जागा देण्यावर चर्चा झाली. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातील रात्री झालेल्या बैठकीत उमटले. या दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला काहीसे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यामुळेच रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगली; मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर बैठक तहकूब करण्यात आली.

राष्ट्रवादीचा शहरातील जागांवर दावा

राष्ट्रवादी शरद पवार गटाला कळवा, मुंब्रा आणि राबोडी परिसरातील जागा देण्यावर प्राथमिक एकमत झाल्याचे दिसून आले. मात्र राबोडीतील काही जागांवर उद्धव सेनेने दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्पष्टीकरण दिल्यानंतर त्या जागा त्यांना मिळाल्याचे समजते. याशिवाय शहरातील इतर काही भागांतील जागांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती; मात्र त्यावर उद्धव सेना आणि मनसेने स्पष्ट नकार दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी

दरम्यान, काँग्रेसने २५ ते ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली असताना, त्यांना केवळ पाच जागाच देण्यात येतील, असा सूर ठाकरे बंधूंच्या पक्षांकडून लावण्यात आला. यामुळे काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “१० जागा हव्या असतील, तर उमेदवार दाखवा, ते निवडून येतील का याचा सर्व्हे सादर करा, त्यानंतरच जागांचा विचार केला जाईल,” अशी भूमिका उद्धव सेना आणि मनसेने घेतल्याची माहिती आहे.

नवी मुंबईतही बैठकांचे सत्र सुरूच

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवी मुंबईत दोन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, त्यासाठी बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत.

काँग्रेसला सोबत घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून, काँग्रेसनेही आघाडीच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनीही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागावाटपावर एकमत होत नसल्याने तिढा कायम आहे.

आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्ही ४६ जागांची मागणी केली असून, घटक पक्षांशी समन्वय सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल.

- मंगेश आमले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र आल्याची घोषणा होताच शहरात फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र या घोषणेला दोन दिवस उलटून गेले तरी जागावाटपावर अंतिम तोडगा निघालेला नाही. शिवसेना (उबाठा) २०१५ मधील पक्षीय बलाबलाच्या आधारे जागावाटपाची भूमिका घेत असताना, मनसेकडून त्याला आक्षेप घेतला जात आहे. “ज्या नगरसेवकांच्या बळावर २०१५ ची तुलना केली जात आहे, त्यापैकी बहुतेकांनी नंतर अन्य पक्षांत प्रवेश केला आहे,” असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी सांगितले, “शिवसेना (उबाठा) सोबत चर्चा सुरू असून, वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”

मनसेची मागणी आमच्यासमोर आली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि वंचित यांच्यासोबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. एक-दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल.

प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (उबाठा) नवी मुंबई

शिवसेना (उबाठा) कडून सध्या प्रभागनिहाय चाचपणी सुरू असून इच्छुक उमेदवारांकडून ४०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू आहे. मनसेसोबत नियमित बैठका सुरू असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आम्ही ३० जागांची मागणी केली असून त्यात ऐरोली-दिघा, जुईनगर, सीवूड्स आणि बेलापूर परिसराचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता बलाबलापेक्षा सकारात्मकतेवर भर देत आम्ही पुढे जाणार आहोत. सर्वांनी एकदिलाने काम केल्यास विजय निश्चित आहे.

-गजानन काळे, जिल्हाध्यक्ष, प्रवक्ते मनसे नवी मुंबई

वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या बॅनरखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आम्ही १५ जागांची मागणी केली असून, एक-दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल.

भरत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

logo
marathi.freepressjournal.in