जी-२० परिषदेमुळे पुन्हा, सुंदर मुंबईचे स्वप्न साकार!

सध्या मुंबईत जी-२० परिषदेची धूम आहे. त्यामुळे ज्या भागात जी-२० परिषदेचे आयोजन केले आहे, त्याठिकाणी ना कचरा ना फेरीवाले ना रस्त्यांत खड्डे हे शक्य झाले
जी-२० परिषदेमुळे पुन्हा, सुंदर मुंबईचे स्वप्न साकार!

विद्रुपीकरण, बेकायदा फेरीवाले, खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे ढीग हे मुंबईकरांच्या कायम नशीबी. यंदा भारताला जी-२० परिषदेचा मान मिळाला ही अभिमानाची बाब नक्कीच आहे. मुंबईत जी-२० परिषद झाली आणि होणार अन् मुंबईचे रुपडे पालटले. विशेष करून सध्या दक्षिण मुंबई चकाचक दिसत असून चकाचक व कचरामुक्त रस्ते दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे जी-२० परिषद कायमच मुंबईत व्हावी, तरचं सुंदर चकाचक मुंबईचे स्वप्न पूर्ण होईल का, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

मायानगरी मुंबई देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे मुंबईत टाचणी पडली, तरी तो आवाज जगभरात ऐकू जातो. त्यामुळे मुंबईत काही घडल, तर त्याची चर्चा तर होणारच. डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईत जी-२० परिषद पार पडली. यावेळीही सुंदर मुंबई अनुभवायला मिळाली. ना फेरीवाला, ना कचरा. पुन्हा एकदा मुंबईत जी-२० परिषद २३ ते २५ या कालावधीत होत आहे. २० देशांचे १२० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. २० देशांचे १२० प्रतिनिधी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. २० देशांचे १२० प्रतिनिधी मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉक करणार असल्याने प्रतिनिधींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यालयात रंगरंगोटी, मुख्यालय परिसरातील रस्ते चकाचक झाले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे प्रतिनिधींचे स्वागत होणार याला कोणी आक्षेप घेण्याचे कारण उद्भवत नाही. प्रश्न असा निर्माण होतो की, वर्षानुवर्षे कर रुपात मुंबई महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा कधी मिळणार. कुठलेही काम नियोजनबद्ध पद्धतीने केले तर ते यशस्वी होते. त्यामुळे जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने मुंबई महापालिका सुंदर मुंबईसाठी झटत आहे, तशीच कायम का झटत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

अनधिकृत फेरीवाले हा प्रश्न आज उदयास आलेला नाही. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कालच निर्माण झाले, असेही नाही. कचऱ्याची समस्या ही पण वर्षानुवर्षे भेडसावत आहे. पाण्याची बोंबाबोंब हा प्रश्न ही कायमचाच. मात्र मुंबईत कोणी व्हीआयपी व्यक्ती येणे, परदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट देतात तर मात्र हे सगळे प्रश्न काही दिवसांत निकाली निघतात. २३ ते २५ मे दरम्यान जी-२० परिषदेसाठी २० देशांतील १२० प्रतिनिधी मुंबईत दाखल. फॉरेनचे डेलिकेट मुंबईत म्हणजे मुंबईचा चेहरामोहरा बदलला. चकाचक रस्ते, रस्ते दुभाजकांवर शोभिवंत झाडांचा बहर, रस्त्यांच्या दुतर्फा असलेले फेरीवाल्यांची सुट्टी, लाखो रुपये खर्चून मुंबईची रंगरंगोटी हे सगळे जी २० परिषदेचे प्रतिनिधी मुंबईत आल्याने. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईची शान जगभरात कायम राहणे गरजेचे आहे. परंतु चकाचक रस्ते, फेरीवाला ना क्षेत्र, कचरा मुक्त रस्ते हे फक्त विशिष्ट वेळीच का, सुंदर व स्वच्छ मुंबई दिसण्यासाठी कायमचं या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी वेळोवेळी केली तर सोन्याहून पिवळं, असं म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोट्यवधी रुपये खर्चून ही रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९ हजार मेट्रिक टनावरुन सहा हजार मेट्रिक टनावर आणले, असा दावा पालिका प्रशासनाचा. मात्र नुकत्याच झालेल्या प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून दररोज ७ हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो हे उघड झाले. मात्र सध्या मुंबईत जी-२० परिषदेची धूम आहे. त्यामुळे ज्या भागात जी-२० परिषदेचे आयोजन केले आहे, त्याठिकाणी ना कचरा ना फेरीवाले ना रस्त्यांत खड्डे हे शक्य झाले ते केवळ अन् केवळ जी-२० परिषदेमुळे. त्यामुळे जी-२० परिषदेचे कायम मुंबईत आयोजन झाले तर सुंदर व स्वच्छ मुंबईचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही, हेही तितकेच खरे.

मुंबई ही कायमचं पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू. त्यामुळे मुंबई कायमचं सुंदर व स्वच्छ दिसणे अपेक्षित असते. मात्र तसे होताना कधीच दिसून येत नाही. यामागे इच्छाशक्ती हा मुख्य मुद्दा आहे. करदात्या मुंबईकरांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत वर्षांला कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो. मात्र त्या तुलनेत सुविधांची नेहमीच ओरड होत असते. सुंदर व स्वच्छ मुंबईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र मुंबई नेहमीच डबक्यात असते. एखादे काम पूर्ण झाले तर ते पुन्हा करण्यासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार हे अर्थपूर्ण राजकारण करणाऱ्या नेते मंडळींना अवगत आहे. तर नेते मंडळींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले अर्थपूर्ण राजकारण यशस्वी करण्यात पालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी धन्यता मानतात. सुंदर व स्वच्छ मुंबईसाठी इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे सुंदर व स्वच्छ मुंबई ही कागदावरच राहिली आहे.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असणार. आलेल्या पाहुण्यांचे मानपान, स्वागत करणे ही आपली परंपरा. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च झाले, तर त्यावर कोणी बोट ठेवेल असे वाटत नाही. मात्र जी २० परिषदेसाठी आलेले २० देशांतील १२० प्रतिनिधी पुन्हा आपल्या मायदेशी परततील तेव्हा स्वच्छ व सुंदर मुंबई उघडी पडेल, पुन्हा मुंबई भकास असे चित्र पहावयास मिळणार नाही, याचा विचार करणे व काळजी घेणे मुंबई महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. तर अन् तरच जी-२० परिषद सफल झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मुंबईकरही तेवढेच जबाबदार

सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे मुंबई महापालिकेची जबाबदारी किंवा कर्तव्य. पण मुंबईकर म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा कुठेही न फेकणे याची काळजी घेणे करदात्या मुंबईकरांची जबाबदारी. त्यामुळे मुंबईच्या विद्रुपीकरणास मुंबई महापालिका जबाबदार तेवढेच मुंबईकरही जबाबदार आहेत, याचा विसर पडता कामा नये.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in