
मी अयोध्येला जात असताना मला हिंदुत्ववाद्यांनीच विरोध केला. मात्र, मला आतले राजकारण माहित होते, हे सगळे कोण करतेय तेही मला माहित होते. ज्यांनी केले त्यांचे आता काय झाले, जे माझ्या वाटेला जातात त्यांचे काय होते हे त्यांना आता समजले असेल. त्यामुळे माझ्या वाटेला जाऊ नका, जे माझ्या वाटेला गेले त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, असा टोला गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत होते. या सभेत सुरूवातीलाच काही दिवसांपूर्वी दादर येथे झालेल्या संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात प्रथमच बोलताना राज यांनी, ज्याने केलेय त्याला आधी कळेल, नंतर सर्वाना कळेल, असा गर्भित इशारा दिला. मी माझ्या कार्यकर्त्यांचे रक्त असे वाया जाऊ देणार नाही, असेही राज यांनी यावेळी सांगितले.
माझ्या सभांना गर्दी होते मग मतं का मिळत नाहीत, असा प्रश्न मला विचारला जातो मग माझे जे १३ आमदार निवडून आले होते ते सोरटवर आले होते का, असा सवाल राज यांनी विचारला. आमच्या पक्षाने १७ वर्षांत जेवढी आंदोलने केली आणि जनतेला न्याय मिळवून दिला, तेवढी कोणत्याच राजकीय पक्षाने केली नाहीत, असेही राज यांनी सांगितले.
दरम्यान महापालिकेच्या निवडणुका होत नसल्याने मी दहावी नापास झालो असल्याचे गेल्या दोन वर्षापसून वाटत आहे. मात्र, जनता सध्याच्या राजकारणाला कंटाळली असून यांचा जो रोजचा तमाशा सुरू आहे त्यालाही जनता वैतागली आहे. त्यामुळे निवडणूक कधी जरी झाली तरी यावेळी महापालिकेच्या सत्तेत मनसे नक्की असेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
१७ वर्षांतील आंदोलनांचे डिजिटल पुस्तक प्रकाशित
या कार्यक्रमात मनसेने गेल्या १७ वर्षात राज्यभरात जी आंदोलने केली आणि जनतेला न्याय मिळवून दिला, त्याचे डिजिटल पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यात नाशिकमध्ये मनसेने सत्तेत असताना केलेली कामे, मोबाईलवरील मराठीसाठी केलेले आंदोलन आणि मिळवलेले यश, टोलचे आंदोलन, मराठी पाट्या, मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नव्हती ती मिळवून दिली, याबाबतचा उहापोह करण्यात आला आहे.