
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष चिन्हावरून निवडणूक आयोगासमोर पार पडलेल्या सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी सातत्याने शरद पवार यांनी हुकुमशहाप्रमाणे पक्ष चालविल्याचा उल्लेख केला. त्यावर शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेत अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी "ज्या ८३ वर्षांच्या बापाने मोठे केले, ज्यांच्या जीवावर सत्तेची फळे चाखली, त्यांनाच हुकुमशहा म्हणताय. थोडी तरी लाज बाळगा!", असे म्हणत हिंमत असेल, तर स्वत:चा पक्ष काढून निवडणुका लढवा, असे आव्हान दिले.
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले असून, आता पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. यासंबंधीची सुनावणीही पार पडली. यासंदर्भात आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या असून, या दोन्ही सुनावण्यांच्या वेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते हुकुमशहाप्रमाणे पक्ष चालवितात, असे अनेकदा बोलून दाखविले. तसेच परस्पर पत्र काढून ते नियुक्त्या करीत होते, असा आरोप केला होता. अजित पवार गटाच्या वकिलाने शरद पवार यांच्यासंदर्भात सातत्याने हुकुमशहा असा उल्लेख केल्याने शरद पवार गटाचे नेते संतापले असून, अजित पवार गटावर आता जोरदार प्रहार केला
तुमच्यात हिंमत असेल, तर पक्ष काढा
अनिल देशमुख यांनी ट्विट करून ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठे केले, त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळे चाखलीत, स्वत:ची संस्थाने उभी केली, त्याच बापाला तुम्ही हुकुमशहा म्हणता. तुमच्यात हिंमत असेल, तर पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, अशा शब्दांत हल्लाबोल केला. त्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांनी आम्ही आमची भूमिका वकिलांकडे मांडली. वकिलाने काय युक्तिवाद करावा, हे त्यांच्या प्रक्रियेचा भाग आहे. पण आम्ही शरद पवारांबद्दल तसे काही बोललो नाही. कारण त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे, असे म्हटले; मात्र, या मुद्यावरून राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आले असून, यावरून पुन्हा एकदा दोन गटांत टोकाचा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.