
मुंबई - वांद्रे येथे एका महिलेचा विनयभंग करुन तिचा मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या बाळू पांडुरंग खैरे या सराईत आरोपीस निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. बाळू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह तोतयागिरी करुन अपहार आणि फसवणुकीचे सहा ते सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. बुधवारी २ ऑगस्टला तक्रारदार महिला तिच्या राहत्या घरातून तिच्या गर्व्हरमेंट कॉलनीत राहणार्या वडिलांच्या घरी जात होती. यावेळी तिथे एक तरुण बाईकवरुन आला आणि त्याने तिच्याशी ओळख वाढून तो तिच्या नातेवाईकांचा परिचित असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन बाईकवर बसण्यास प्रवृत्त केले. गर्व्हरमेंट कॉलनीजवळ येताच त्याने तिच्या छातीवर अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. तिचा मोबाईल घेऊन पळून गेला होता. या घटनेनंतर या महिलेने निर्मलनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह मोबाईल अपहारप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीस ठाण्यातील दिवा, दातिवली परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव बाळू खैरे असल्याचे उघडकीस आले. तो सायन येथील सायन-कोळीवाडा पाईपलाईन, प्रतिक्षनगरचा रहिवाशी आहे. त्यानेच अशाच प्रकारे मोडस वापरुन सात ते आठ महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आरएके मार्ग, नेहरुनगर, पवई, वरळी, माटुंगा, खार पोलीस ठाणत विनयभंगासह तोतयागिरी करुन अपहार व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. काम देतो, कामावर सोडतो, तुमच्या भावाचा तसेच पतीचा मित्र असल्याची बतावणी करुन त्याने आतापर्यंत अनेक गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.