‘त्या’ मुलांची वयोमर्यादा २१ होणार; महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

अनाथ मुलांमधून आदर्श व्यक्ती घडविण्याचे तर्पण फाउंडेशनचे कार्य जगातील सर्वात श्रेष्ठ कार्य असून अनाथ मुलांबाबत प्रश्नांना न्याय देण्यासाठी विधान परिषद सभापती म्हणून मी कटिबद्ध आहे.
‘त्या’ मुलांची वयोमर्यादा २१ होणार; महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
एक्स @iAditiTatkare
Published on

मुंबई : अनाथ मुलांमधून आदर्श व्यक्ती घडविण्याचे तर्पण फाउंडेशनचे कार्य जगातील सर्वात श्रेष्ठ कार्य असून अनाथ मुलांबाबत प्रश्नांना न्याय देण्यासाठी विधान परिषद सभापती म्हणून मी कटिबद्ध आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. तर अनाथालय बालगृहात राहणाऱ्या अनाथ मुलांची वयोमर्यादा १८ वरून २१ करणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तर्पण युवा पुरस्कार सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या.

अनाथालय व बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘तर्पण युवा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महिला व बाल विकास विभाग कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे, विधानपरिषदेचे आमदार व तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांत भारतीय उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून वोक्हार्ट लिमिटेड चे कार्यकारी संचालक डॉ. हुजैफा खोरेकीवाला, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि इस्कॉनचे प्रवक्ते श्री नित्यानंद चरणदास उपस्थित होते.

सनाथ वेलफेअर फाऊंडेशनच्या संस्थापिका गायत्री पाठक, स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने आणि श्री संस्कार मतिमंद मुलींचे वसतिगृह च्या अध्यक्षा मंगल वाघ यांना सभापती राम शिंदे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तर्पण युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

तर्पण फाउंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, अनाथ मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालगृहातून किंवा अनाथालयातून बाहेर काढले जाते. परंतु हीच ती वेळ असते जेव्हा त्यांना भविष्याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.

प्रा. शिंदे म्हणाले की, तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार भारतीय यांनी निर्णयाला अनुसरून अनाथ बालकांना प्रशिक्षण देण्याचे, त्यांच्यातून एक आदर्श व्यक्तिमत्त्व तयार करण्याचे काम केले. 'तर्पण फाऊंडेशन' अनाथांचा सांभाळ आईवडिलांप्रमाणे करीत आहे. म्हणून या कार्याला मी जगातील सर्वश्रेष्ठ कार्य म्हणतो.

गेल्या ७५ वर्षांत अनाथांना आरक्षण देण्याचा विचार एकाही राजकारण्याच्या मनात आला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांना शासनामध्ये नोकरीसाठी एक टक्का आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

- प्रा. राम शिंदे,

सभापती, विधान परिषद

logo
marathi.freepressjournal.in