दुसऱ्या दिवशी अंगणवाडी सेविका आक्रमक; सुरक्षा बॅरिकेट्स तोडून मंत्रालयाकडे जाण्याच्या प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

अनेक महिलांची मुले गावी आहेत. त्यांची काळजी लागली आहे. जेवण करायला पैसे नाहीत. गावावरून बांधून आणलेल्या भाकरी संपल्या आहेत. स्वच्छतागृहात पैसे घेत आहेत.
दुसऱ्या दिवशी अंगणवाडी सेविका आक्रमक; सुरक्षा बॅरिकेट्स तोडून मंत्रालयाकडे जाण्याच्या प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांप्रती सरकार अद्यापही शांत असल्यामुळे गुरुवारी आझाद मैदानात या महिला आक्रमक झाल्या. पोलिसांनी लावलेल्या सुरक्षा बॅरिकेट्स जवळ अंगणवाडी सेविका आक्रमक होत बॅरिकेट्स तोडून रास्ता रोको व मंत्रालयाकडे जाण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत होत्या. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.

दरम्यान, आंदोलनादरम्यान संगीता जाधव या अंगणवाडी मदतनीस महिलेचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. तर मंगल गुजर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात हलविण्यात आले. लाखोंच्या संखेने आलेल्या या अंगणवाडी सेविका आझाद मैदानातील धुळीमुळे खोकत आहेत. अपुरे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची कमतरता, जेवणाचे हाल, फोन चार्जिंगची असुविधा, डास, दुर्गंधी, पहाटे थंडी अशी बिकट अवस्था या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची झाली आहे.

अनेक महिलांची मुले गावी आहेत. त्यांची काळजी लागली आहे. जेवण करायला पैसे नाहीत. गावावरून बांधून आणलेल्या भाकरी संपल्या आहेत. स्वच्छतागृहात पैसे घेत आहेत. पिण्याचे पाणी अशुद्ध आहे, असे सीमा कदम या अंगणवाडी सेविकेने सांगितले. मंत्रालयात शिष्टमंडळ चर्चा करायला गेले तेव्हा सर्व अंगणवाडी सेविका निषेध गाणी म्हणत होत्या. तर काही महिलांना प्रसिद्धी माध्यमांनी घेरले होते.

logo
marathi.freepressjournal.in