
मुंबई : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मुंबईतील १५ रेल्वे स्थानकात एफओबी, टॉयलेटची सुधारणा, स्थानकातील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना, रेल्वे स्थानकातील प्रवाशांना सुविधा देणारे आदींनी १५ ऑगस्टपर्यंत आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. जेणेकरून प्रवाशांना रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे सोयीस्कर होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
भारतीय रेल्वे मार्गावर दररोज १४ हजार मेल-एक्स्प्रेस गाड्या धावतात. ७ हजार ५०० स्थानकांवरून दररोज २.२५ कोटी प्रवासी प्रवास करतात. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजना (एबीएसएस) अंतर्गत भारतीय रेल्वेवरील १२०० हून अधिक स्थानकात प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा वाढीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने ७६ स्थानकांवर प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्याचा प्लॅन तयार केला आहे.
या सुविधांमध्ये होणार सुधार
अतिरिक्त एफओबीची तरतूद, लिफ्ट आणि एस्कलेटरची तरतूद, वेटिंग हॉल आणि टॉयलेटमध्ये सुधारणा, स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा, स्थानकांवर आकर्षक विद्युत रोषणाई व चिन्हात सुधारणा, ट्रेन इंडिकेटर बोर्डची तरतूद आणि सुधारणा, कोच इंडिकेशन बोर्ड, वाहन पार्किंगमध्ये सुधारणा, प्लॅटफॉर्मवर कव्हरची सुधारणा व विस्तार
या स्थानकात मिळणार दर्जेदार सुविधा
भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूर मार्ग, वडाळा रोड, सॅडहर्स्ट रोड, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा व इगतपुरी