
मुंबई : सुप्रसिद्ध आणि यशस्वी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठे दु:ख व्यक्त होत आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचलले असावे, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांनी कर्जत येथे उभारलेल्या त्यांच्या एका महत्त्वाकांक्षी कला स्टुडिओचे कर्ज आणि त्याच्या वसुलीतून समोर आलेल्या बँकांच्या ‘पठाणी’ वसुली प्रक्रियेतून त्यांच्यावर अशी दुर्दैवी वेळ ओढवल्याच्या चर्चेला जणू दुजोराच मिळाला आहे.
नितीन देसाई यांचे स्नेही, तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर यांच्या श्रद्धांजलीपर प्रतिक्रियेतून काही बाबी स्पष्ट झाल्या आहेत. अनासकर म्हणाले की, “नितीन देसाई यांच्या अशा जाण्याने अतिव दु:ख झाले. ते माझे चांगले स्नेही होते. मध्यंतरी राज्य सहकारी बँकेत त्यांनी कर्ज मागणीसाठी भेटही दिली होती. आर्थिक विवंचना आणि कर्जवसुलीच्या प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.”
या पार्श्वभूमीवर कर्ज घेऊ इच्छिणारे व कर्ज मंजूर करणाऱ्या वित्तीय संस्थांनी कर्जाची व्यवहार्यता पाहून कर्ज दिल्यास अशा दु:खद घटना टाळता येतील. बऱ्याच वेळेच संबंधित कर्जास उपलब्ध असलेले तारण व त्याचे मूल्य पाहून कर्ज दिले जाते, परंतु त्या कर्जाच्या विनियोगातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा बारकाईने विचार केला जात नाही. ‘पाहिजे तेव्हा म्हणजे योग्य वेळी व आवश्यक तेवढाच कर्जपुरवठा’ ही कर्जाची खरी द्विसूत्री आहे, मात्र वित्तीय संस्थांकडून याबाबत निष्काळजीपणा होत असल्याचे दिसून येते. यामुळे नितीन देसाईंसारख्या हळव्या मनाच्या व्यक्तींना अशा परिस्थितीशी सामना करताना नैराश्य येते व त्यातून अशा दु:खद घटना घडतात.
कर्ज थकित झाल्यानंतर त्याच्या वसुलीसाठी तारण मालमत्तेची जप्ती व विक्री हा एकमेव पठाणी मार्ग न अवलंबता, वित्तीय संस्थांनी त्या उद्योगास प्रथम ‘आजारी उद्योग’ म्हणून घोषित करत त्याची, पुनर्बांधणी करणे आवश्यक असते. तसेच कर्जाची परतफेड ही उत्पन्नातूनच होण्यासाठी कर्जदारास उत्पन्नक्षम बनविण्याची जबाबदारी वित्तीय संस्थांनी घेतल्यास आणि पठाणी जप्ती व विक्री हा शेवटचा पर्याय ठेवल्यास अशा दु:खद घटनांना आळा बसेल. नीरव मोदी, विजय मल्ल्यासारखे अनेक कर्जदार कोट्यवधींचे कर्ज बुडवून देशाबाहेर मजेत राहतात आणि कलाक्षेत्रात काहीतरी भव्यदिव्य करायचे स्वप्न उराशी बाळगून कर्ज उभारणी करणारा एक मनस्वी मराठी कलावंत आर्थिक विवंचनेमुळे आपले जीवन संपवतो, यावर बँकिंग क्षेत्राने विचारमंथन करणे गरजेचे ठरेल, असा महत्त्वपूर्ण सल्ला सुद्धा बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनासकर यांनी दिला आहे.