
महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडील खात्याचे ऑडिट सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिट सुरूही करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यभरातील युवासैनिकांच्या भेटी घेत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून एक नवी ताकद उभी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. यात त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. बंडखोरांच्या मतदारसंघातही होणारी गर्दी हा चर्चेचा विषय होताना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आदित्य ठाकरेंना समर्थन दर्शवत असून, त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे आॅडिट करण्याचा निर्णय घेत दबावतंत्राचा अवलंब करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.