मगरीचे पिल्लू प्राणीसंग्रहालयातूनच घुसले ; सीसीटीव्ही फुटेजमधून उघड

प्राणीसंग्रहालयाने आरोप फेटाळले
मगरीचे पिल्लू प्राणीसंग्रहालयातूनच घुसले ; सीसीटीव्ही फुटेजमधून उघड

मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात दोन दिवसांपूर्वी सापडलेले मगरीचे पिल्लू शेजारील प्राणीसंग्रहालयातूनच आल्याचे स्पष्ट झाले आहे. जलतरण तलावात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले असता मगरीचे पिल्लू प्राणीसंग्रहालयातून आल्याचे दिसत आहे.

दादर येथील प्राणीसंग्रहालय बेकायदा असून कायदेशीर कारवाई करण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे व वनखात्याला पत्र दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी प्राणीसंग्रहालय सुरू केले असून मगर ठेवण्यासाठी सेंट्रल झू ॲॅथोरिटीची परवानगी असणे गरजेचे आहे. त्यामुळे मगर ठेवण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सांगत प्राणीसंग्रहालयाने पालिकेचे आरोप फेटाळले.

महात्मा गांधी जलतरण तलावात मंगळवारी सापडलेल्या मगरीच्या पिल्लामुळे मोठी खळबळ उडाली होती. हे पिल्लू नेमके आले कुठून, असा प्रश्न पालिकेला पडला होता. दरम्यानच्या काळात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हे मगरीचे पिल्लू बाजूच्या प्राणी संग्रहालयातून आल्याचा दावा केला होता. मात्र प्राणी संग्रहालयाच्या मालकाने तो फेटाळून लावला होता. अखेर पालिकेने प्राणी संग्रहालयाच्या बाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची बारकाईने तपासणी केली असता, हे पिल्लू प्राणी संग्रहालयातूनच जलतरण तलावाकडे येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयाच्या मालकाची अडचण आता वाढली आहे.

दरम्यान, हे प्राणी संग्रहालय नसून हा प्राणी तस्करीचा अड्डा, असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. प्राणी संग्रहालयाच्या परवानगीचा विषय हा वन्यजीव खात्याच्या अंतर्गत येतो. या ठिकाणी पालिकेला कारवाईचे अधिकार नाहीत. त्यामुळे पालिकेने शिवाजी पार्क पोलीस ठाणे व वनखात्याला संबंधित प्राणी संग्रहालयावर कारवाई करण्यासाठी पत्र दिल्याचे उपायुक्त (उद्यान) किशोर गांधी यांनी सांगितले.

जागा बळकावण्यासाठी आरोप! शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावाशेजारी दोन महिन्यांपूर्वी प्राणीसंग्रहालय सुरू केले आहे. याआधी ही जागा मोकळी होती. त्यामुळे या जागेवर अनेकांचा डोळा असून जागेवर ताबा मिळवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. प्राणीसंग्रहालयात प्रौढ व्यक्तींकडून २० रुपये प्रवेश फी आकारली जाते. लहान मुलांना मोफत प्रवेश आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर प्राणीसंग्रहालय सुरू असून कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे प्राणीसंग्रहालयाकडून सांगण्यात आले.

वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अॅक्टखाली प्रकरण

हे प्रकरण वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अॅक्टखाली प्रकरण येते. त्यामुळे हे प्रकरण तिकडे वर्ग केले. मगरीचे पिल्लू पंचनामा करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अतिरिक्त कार्यभार) संभाजी मुरकुटे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in