बाप्पाच्या सजावटीसाठी बाजार गर्दीने फुलला;माळा, विद्युत रोषणाई, पूजा साहित्य खरेदीसाठी झुंबड

मंगलमय वातावरण निर्माण झाले असून ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या घोषणांनी मुंबई दुमदुमली आहे.
बाप्पाच्या सजावटीसाठी बाजार गर्दीने फुलला;माळा, विद्युत रोषणाई, पूजा साहित्य खरेदीसाठी झुंबड

देशभरात गणेशोत्सवाची धूम असली तरी मुंबईत गणेशोत्सवाचा आनंद वेगळाच असतो. त्यात दोन वर्षांनंतर कोरोनाचा धोका कमी झाला असून, यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत आहे. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, रविवारी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासह पूजेसाठी साहित्य खरेदी, हार, फुले, मकर, आकर्षक लाइट्स, गौरींच्या मुखवट्यांच्या खरेदीसाठी दादर, लालबाग, क्राफर्ट मार्केटसह मुंबईतील बाजार गर्दीने फुलले. विशेष म्हणजे, साहित्य खरेदीसाठी विरार, डोंबिवली, कल्याण, पनवेल येथील गणेशभक्तांची गर्दी झाली होती. त्यामुळे मुंबईत मंगलमय वातावरण निर्माण झाले असून ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या घोषणांनी मुंबई दुमदुमली आहे.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते. मुंबईत कोरोनाच्या चार लाटा धडकल्या; मात्र मुंबई महापालिका व राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे चौथ्या लाटेला रोखण्यात यश आले. त्यामुळे मुंबई निर्बंधमुक्त झाली आहे. बुधवार, ३१ ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार असून, पुढील १० दिवस म्हणजेच ९ सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी महिना-दीड महिना आधीच सुरू होते. रविवारी मुंबईतील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. लालबाग चिवडा गल्लीत वेगवेगळ्या माळा, मखरांच्या वर उभे केलेले छत तसेच सजावटीच्या सामानांची खरेदी-विक्री जोमाने सुरू होती. दुपारनंतर या भागात गर्दी उसळली होती. दादरच्या छबिलदास रोडवरील बाजारात दिव्यांचा घाऊक बाजार आहे. त्यामुळे तेथून आकर्षक दिव्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

दादर मार्केट हे मध्यवर्ती असल्याने या ठिकाणी मुंबई बाहेरील ग्राहकही मोठ्या प्रमाणात येत असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत दादरमध्ये पाय ठेवायला जागा नसते. सुगंधी अगरबत्ती, धूप, कंठी माळ, देवाचे वस्त्र, कापूस, प्लास्टिक फुलांचे हार असे पूजेचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असते.

दिवे रोषणाईत माळांसह एलईडी दिव्यांचे घुमट, डान्सिंग दिवे, एलईडी फोकस, एलईडी दिव्यांची पेन्सिल, ओम, श्री व स्वस्तिक किंवा गणपतीच्या आकारातील एलईडी दिवे बाजारात उपलब्ध आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in