काही दिवसांपूर्वी धोकादायक, विषारी अशा ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशचा जुहू समुद्रकिनाऱ्यावरील वावरामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर पालिकेकडून तसेच मरिन लाइफ ऑफ मुंबई संस्थेकडून पर्यटकांनी अनवाणी किनाऱ्यावर न फिरण्याचे आवाहन केले. पर्यटकांनी याची चांगलीच धास्ती घेतली असताना जुहू समुद्रकिनाऱ्यापाठोपाठच आता गिरगाव चौपाटीवरही ‘ब्लू बॉटल’ जेलिफिश दिसू लागले आहेत.
जुहू समुद्रकिनाऱ्यावर जुलै महिन्यात ‘ब्लू बॉटल’ आढळले होते. त्यामुळे जुहू समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर मंगळवार ९ ऑगस्ट रोजी गिरगाव चौपटीवर देखील ‘ब्लू बॉटल’ आढळले आहेत. समुद्राच्या लाटांसोबत तरंगत ‘ब्लू बॉटल’ किनाऱ्यावर येत असून सध्या चौपाटीवर ‘ब्लू बॉटल’ विखुरलेले आहेत, अनवाणी फिरू नये, असे जीवरक्षकांकडून सांगण्यात येत आहे.