आर्थिक वर्षात ३,१९६ कोटींची करवसुली; पुढील तीन महिन्यांत उर्वरित रक्कम जमा करण्याचे लक्ष्य

जकात कर बंद झाल्यानंतर ‘मालमत्ता कर’ हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर नागरिकांनी जमा करावा, यासाठी महापालिकेचा प्रयत्न होता. यासाठी मोठ्या मालमत्ता करधारकांकडील करवसुलीसाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू ठेवला.
आर्थिक वर्षात ३,१९६ कोटींची करवसुली; पुढील तीन महिन्यांत उर्वरित रक्कम जमा करण्याचे लक्ष्य

मुंबई : मुंबईत मालमत्ता कर भरणाऱ्या ५ लाख ९८ हजार ३६८ मालमत्ता आहेत. ३१ मार्चपर्यंत म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात ४५०० कोटींचा मालमत्ता करवाढ जमा करण्याचे लक्ष्य मुंबई महानगरपालिकेने ठेवले होते. मात्र ५ लाख ९८ हजार ३६८ मालमत्ताधारकांपैकी २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत ३ हजार १९६ कोटींचा कर भरला आहे. त्यामुळे ३ लाख ४४ हजार ७६३ मालमत्ताधारकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले असून पुढील तीन महिन्यांत उर्वरित कर वसूल करण्यात येईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

जकात कर बंद झाल्यानंतर ‘मालमत्ता कर’ हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर नागरिकांनी जमा करावा, यासाठी महापालिकेचा प्रयत्न होता. यासाठी मोठ्या मालमत्ता करधारकांकडील करवसुलीसाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे सरत्या आर्थिक वर्षात म्हणजे ३१ मार्च, २०२४ पर्यंत मालमत्ता कराची ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये इतकी वसुली झाली आहे, अशी माहिती सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे यांनी दिली.

करनिर्धारण व संकलन विभागातर्फे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवण्यास सुरू झाल्यानंतर दिलेल्या कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्‍ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टींच्‍या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्‍यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. तसेच, मागील थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपये, २८ मार्च २०२४ रोजी ३०४ कोटी रुपये, २९ मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रुपये, ३० मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रुपये आणि ३१ मार्च २०२४ रोजी १९० कोटी ३४ लाख रुपयांचे विक्रमी संकलन करण्‍यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्‍या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्‍यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्‍या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. तर, उर्वरित ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्तांना करआकारणी केली जाते. सन २०२३-२४ मध्‍ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ताधारकांनी मिळून एकूण वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपयांचा कर भरणा केला आहे.

सर्वाधिक कर संकलन पश्चिम उपनगरांत

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक मालमत्ता करसंकलन हे ‘एच पूर्व’ विभागामध्ये झाले आहे. त्यांनी ३३६.४५ कोटी रुपये इतका कर जमा केला आहे. त्याखालोखाल ‘के पूर्व’ विभागामध्ये ३१७.४८ कोटी रुपये, ‘जी दक्षिण’ विभागामध्ये २५७.११ कोटी रुपये मालमत्ता करसंकलन झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही भागातील मालमत्ता करसंकलनाचा विचार केल्यास, सर्वाधिक कर संकलन हे पश्चिम उपनगरांमध्ये १,५९०.०९ कोटी रुपये, शहर भागात ९१७.०५ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमध्ये ६७८.४२ कोटी रुपये इतके झाले आहे.

विभागनिहाय मालमत्ता कर संकलन

  • ए विभाग - १५३ कोटी ०१ लाख रु.

  • बी विभाग - २२ कोटी ३३ लाख

  • सी विभाग - ४१ कोटी ९३ लाख

  • डी विभाग - ११४ कोटी ४१ लाख

  • ई विभाग - ६९ कोटी ४६ लाख

  • एफ दक्षिण विभाग - ५७ कोटी ८५ लाख

  • एफ उत्तर विभाग - ६९ कोटी २३ लाख

  • जी दक्षिण विभाग - २५७ कोटी ११ लाख

  • जी उत्तर विभाग - १३१ कोटी ७२ लाख

  • एच पूर्व विभाग - ३३६ कोटी ४५ लाख

  • एच पश्चिम विभाग - १८५ कोटी ५३ लाख

  • के पूर्व विभाग ३१७ कोटी ४८ लाख

  • के पश्चिम विभाग - २३८ कोटी २८ लाख

  • पी दक्षिण विभाग - १६७ कोटी २१ लाख

  • पी उत्तर विभाग - ११५ कोटी ०३ लाख

  • आर दक्षिण विभाग - ८५ कोटी ७४ लाख

  • आर मध्य विभाग - १०५ कोटी ०७ लाख

  • आर उत्तर विभाग - ३९ कोटी ३० लाख

  • एल विभाग - १३९ कोटी ३४ लाख

  • एम पूर्व विभाग - ५५ कोटी ०८ लाख

  • एम पश्चिम विभाग - ७३ कोटी रुपये

  • एन विभाग - १०३ कोटी ०८ लाख

  • एस विभाग - २२६ कोटी २२ लाख

  • टी विभाग - ८१ कोटी ७० लाख

  • शासन मालमत्‍ता - ११ कोटी ३५ लाख

  • एकूण - ३,१९५ कोटी ९१ लाख ११ हजार रु.

logo
marathi.freepressjournal.in