
लाईफ गार्ड, मच्छिमार यांची नजर चुकवत जुहू चौपाटी येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचे मृतदेह मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सापडले. समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सोमवारी सायंकाळी ५ मुले पाण्यात बुडाली होती. त्यापैकी एकाला स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र, चार मुले समुद्रात बेपत्ता झाली होती. ही चारही मुले सांताक्रुझ पूर्व दत्त मंदिर परिसरात राहायला होती. दरम्यान, या चौघांमध्ये शुभम व मनीष हे सख्खे भाऊ होते, तर धर्मेश व जय ताजभारिया हे दोघे चुलत भाऊ असल्याचे समजते.
वाकोला, सांताक्रुझ (प.) परिसरात राहणारी १२ ते १६ वयोगटातील पाच मुले जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायंकाळी ५.३० च्या सुमारास पोहायला गेले होते. मात्र, समुद्राला भरती असल्याने त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांना काही समजण्यापूर्वीच ते समुद्रात लाटांच्या प्रवाहासोबत समुद्रकिनाऱ्यात पडून अर्धा किमी आतमध्ये ओढले जाऊन बुडू लागले. त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. ते बुडत असल्याचे पाहून स्थानिक कोळी बांधवांनी तत्काळ समुद्रात उडी घेऊन धर्मेश ताजभारिया (१६) याला बाहेर काढले. मात्र, इतर चौघे जण समुद्रातील खोल पाण्यात बुडाल्याने वाहत गेले. या चौघांचा स्थानिक कोळी बांधव, पोलीस, अग्निशमन दल, जीवरक्षक व नेव्ही यांनी हेलिकॉप्टरद्वारे रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र, त्यावेळी समुद्राला मोठी भरती असल्याने शोधकार्यात अडथळे आले.
परिणामी त्या मुलांचा शोध थांबविण्यात येऊन पुढील तपासकार्य पूर्णपणे स्थानिक पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान, सदर दुर्घटना घडल्यापासून पुढील २४ तासांत समुद्रात बुडालेले चौघे जण एकेक करून सापडल्यानंतर त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन व नजीकच्या कूपर रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही मुले राहत असलेल्या वाकोला परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत मुलांची नावे -
(१) जय रोहन ताजभारिया (१६)
(२) मनीष योगेश ओगानिया (१६)
(३) शुभम योगेश ओगानिया (१६)
(४) धर्मेश वालजी फौजिया (१६)