आरडीएक्सने भरलेला टँकर गोव्याकडे निघाल्याच्या बोगस कॉलने खळबळ

एकजण ताब्यात : रत्नागिरीत सापडलेल्या टँकरमध्ये आक्षेपार्ह काही नाही
आरडीएक्सने भरलेला टँकर गोव्याकडे निघाल्याच्या बोगस कॉलने खळबळ
Twitter

मुंबई : गुजरातहून गोव्याच्या दिशेने आरडीएक्सने भरलेला एक टँकर रवाना झाला असून, त्यात दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याच्या कॉलने मुंबई पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, हा कॉल बोगस असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हा टँकर रत्नागिरी येथे स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यात काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांना कॉल करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

शनिवारी मध्यरात्री मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एक फोन कॉल आला होता. यावेळी समोरील व्यक्तीने गोव्याहून गुजरातला एक टँकर जात असून, या टँकरमध्ये आरडीएक्स असून, दोन पाकिस्तानी दहशतवादी आहेत. त्यांचा मोठा घातपात घडविण्याचा कट असल्याचे सांगून त्याने फोन कट केला होता. या कॉलनंतर संबंधित पोलिसांनी ती माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर ही माहिती राज्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी सुरू केली. नाकाबंदी सुरू असताना कॉलरने दिलेल्या क्रमांकाचा टँकर रत्नागिरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने संगमेश्‍वर येथील बांगरी गावाजवळून ताब्यात घेतला.

या टँकरची कसून तपासणी केल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. या टँकरमध्ये प्लेसिटकायझर नावाचे एक रसायन होते. ते रसायन गुजरात येथे नेण्यात येणार होते. याप्रकरणी ट्रकचालकाची पोलिसांनी चौकशी केली, मात्र त्याच्या चौकशीतून संशयास्पद काहीच आढळले नाही. दुसरीकडे या कॉलची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत संशयित व्यक्तीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोनवरून ही माहिती दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याचे नाव पांडे असून, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. कॉल करताना त्याने मद्यप्राशन केले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in