मुंबई : कांदिवलीतील एका अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीचे नाव योगेश कांबळे असून, त्याच्या पत्नीच्या प्रियकरानेच त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी प्रियकर रविंद्र सूर्यमान गिरी याला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत योगेशची पत्नीचीही लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे या हत्येनंतर स्वत रविंद्र पोलिसांसोबत मदतीचे नाटक करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन दिवसांपूर्वी कांदिवलीतील दामूनगर, खदानाजवळ एक अज्ञात व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती समतानगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या व्यक्तीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. त्याची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. यावेळी मृत व्यक्तीचे नाव योगेश कांबळे असल्याचे उघडकीस आले होते. योगेश हा दामूनगर परिसरात त्याच्या आई, पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. मिळेल ते काम करणाऱ्या योगेशला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यातून त्याचे त्याच्या पत्नीसोबत सतत खटके उडत होते. त्याचा आरोपी रविंद्र हा मित्र असल्याने त्याची त्याच्या पत्नीशी चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्याकडून योगेश हा तिला सतत मारहाण करत असल्याचे समजले होते. त्यातून रविंद्रने योगेशच्या हत्येची योजना बनविली होती. ३० नोव्हेंबरला तो त्याला मद्यप्राशन करण्यासाठी खदानाजवळ घेऊन आला. तिथे या दोघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर त्याने त्याच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. तो मयत झाल्याचे समजून रविंद्र त्याची बॅग घेऊन पळून गेला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये योगेश हा रविंद्रसोबत जात असल्याचे दिसून आला होता. हाच धागा पकडून त्याला पकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण राणे यांच्यासह त्यांच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.