रस्ता खचत असल्याने माहुल खाडीवरील पूल धोकादायक

तांत्रिक सल्लागार म्हणून मे. टीपीएफ इंजिनीरिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली असून ८० लाख ५८ हजार रुपये पालिका मोजणार आहे
 रस्ता खचत असल्याने माहुल खाडीवरील पूल धोकादायक

चेंबूर पूर्व मुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ जोड रस्ता खचत असल्याने येथील पूल धोकादायक स्थितीत असून त्या ठिकाणी आरसीसीचे दोन नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. या दोन पुलांच्या बांधकामाला पालिकेची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी मुंबई महापालिका तब्बल ५७ कोटी ४१ लाख १४ हजार ७६२ रुपये खर्चणार आहे. दरम्यान, रस्त्याचे आराखडे, निविदा व संररचना बनविण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मे. टीपीएफ इंजिनीरिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली असून ८० लाख ५८ हजार रुपये पालिका मोजणार आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांनी पूर्व मुक्त मार्गाचे बांधकाम करून पुढील देखभालीकरिता सदर पूर्व मुक्त मार्ग मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) या खात्यास २ मे २०१५ रोजी हस्तांतरित केलेला आहे. या ठिकाणी आणिक पांजरपोळ जोडरस्ता येथील माहुल खाडीवरील सद्यस्थितीतील दोन पूलांच्या दोन्हीबाजुकडील रस्ता खचल्यामुळे वाहनांना दणके बसतात व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर ठिकाणची जमीन ही कमकुवत असल्याकारणाने नवीन रस्ते बांधुनही सदर रस्त्याचा भाग खचत राहतो. त्यामुळे सदर ठिकाणी पूल बांधणे गरजेचे आहे, असे पूल विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन नवीन पूल बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पावसाळा वगळून २४ महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच भुयारी मार्गाच्या लागत असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांचा उतार विरुध्द्ध दिशेने असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. जलवाहिन्याच्या पुनर्बांधणीचे काम होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in