भटक्या कुत्र्यांच्या गणनेला ‘तारीख पे तारीख’ ; गणना करणाऱ्या संस्थेने दिला ऑक्टोबरचा मुहूर्त

संस्थेकडून याआधी दोन वेळा आणि आता ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या गणनेसाठी संस्थेकडून ‘तारीख पे तारीख’
भटक्या कुत्र्यांच्या गणनेला ‘तारीख पे तारीख’ ; गणना करणाऱ्या संस्थेने दिला ऑक्टोबरचा मुहूर्त

मुंबईत भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती, याची गणना करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या गणनेसाठी ‘ह्युमन सोसायटी’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची निवड केली आहे. या संस्थेला भटक्या कुत्र्यांच्या गणनेसाठी पालिका १२ लाख ६० हजार रुपये मोजणार आहे. मात्र संस्थेकडून याआधी दोन वेळा आणि आता ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या गणनेसाठी संस्थेकडून ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे.

भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी १९९४ पूर्वी गॅस चेंबर मध्ये टाकून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झाली असे निदर्शनास आले नाही. त्यामुळे ‘ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थे’च्या माध्यमातून मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. मात्र त्यावेळच्या आकडेवारीत आणि आता भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता, भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठा फरक पडला असावा. त्यामुळे जगभरातील भटक्या कुत्र्यांची गणना करणाऱ्या ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याआधी संस्थेने जानेवारी महिन्यात गणना करणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु वेळ उपलब्ध नसल्याने जून महिन्यात भटक्या कुत्र्यांची गणना करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र जून महिन्यात ही वेळ नसल्याचे स्पष्ट करत आता ऑक्टोबर महिन्याची तारीख दिली आहे. संस्थेकडून वारंवार तारीख दिली जात असल्याने भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती, काय उपाययोजना करायच्या, या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया रखडल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, संस्थेने ऑक्टोबर महिन्यात भटक्या कुत्र्यांची गणना करण्यास सुरुवात केल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांची गणना करून अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. सुरक्षित मुंबईत आता भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. माणसापेक्षा प्रामाणिक म्हणून कुत्र्याकडे बघितले जाते. मात्र याच भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

साडेतीन लाख मुंबईकरांचा कुत्र्यांनी घेतला चावा

गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांचे लचके तोडल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची गणना केली असता, मुंबईत २ लाख ९६ हजार २२१ भटके कुत्रे आढळले होते. मात्र सद्यस्थितीत मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती, याचा शोध घेण्यासाठी ह्युमन सोसायटी या इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in