

मुंबई : युटर्न नसताना वाहतूक नियमांचे उल्लघंन करुन युटर्न घेऊन थांबण्याचा इशारा करूनही एका पोलीस हवालदाराला समोरुन जोरात धडक देऊन कारचालकाने पलायन केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. या अपघातात लक्ष्मण मधुकर मोजर हे पोलीस हवालदार जखमी झाले असून, त्यांच्यावर फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी कारचालकाविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. लक्ष्मण मोजर हे नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहत असून, कुर्ला वाहतूक पोलीस चौकीत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
मंगळवारी ते त्यांचे सहकारी रोहिदास निकम यांच्यासोबत कुर्ला येथील एलबीएस मार्गावर कर्तव्य बजावत होते. यावेळी एका वॅगन कारने युटर्न नसताना युटर्न घेऊन घाटकोपरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला; कारचालकाने त्यांच्याकडे लक्ष न देता वेगात कार नेण्याचा प्रयत्न केला. जिवे मारण्याच्या उद्देशाने या कारचालकाने जोरात कार चालवून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात लक्ष्मण मोजर यांच्या पायांना तसेच हातांना गंभीर दुखापत झाली होती.