कार पुलावरून मालगाडीवर पडली ;पत्रकारासह तिघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

या अपघातानंतर अपघाताची माहिती कळताच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड उपस्थित होते
कार पुलावरून मालगाडीवर पडली ;पत्रकारासह तिघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी
Published on

कर्जत : कर्जतहून नेरळकडे जाणारी कार मंगळवारी पहाटेच्या सुमारास पनवेल–कर्जत रेल्वेमार्गावरील रेल्वे पुलावरून खाली पडली. ही कार मालगाडीवर पडून झालेल्या विचित्र अपघातात एका पत्रकारासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्रथमोपचार करून पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन भाऊ व दोन मित्र हे आपल्या कारने नेरळकडे जात असताना कर्जत-कल्याण रस्त्यावर किरवली गावाजवळ त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. पुलाचे रेलिंग तोडून ती कार सुमारे ३५ फूट खाली पडली. त्याचवेळी पुलाखालून पनवेलहून कर्जतकडे मालगाडी चालली होती. ही कार त्या मालगाडीवर जोरात आपटली. त्या मालगाडीच्या मागील तीन डब्यांच्या दोन कपलिंग तुटून मालगाडीपासून तीन डबे वेगळे झाले. या भीषण अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (४१), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८) यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष सखाराम जाधव (रा. नेरळ) आणि जयवंत रामचंद्र हबाळे (रा. बेकरे) यांना पनवेलच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने घेतली असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी भेट दिली.

या अपघातानंतर अपघाताची माहिती कळताच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड उपस्थित होते. धर्मानंद गायकवाड हे पत्रकार म्हणून गेली २२ वर्षे काम करीत असून रायगड प्रेस क्लब या संघटनेत जिल्हा उपाध्यक्ष तसेच कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in