मेक इन इंडियाच्या अंतर्गत सीबीटीसी प्रकल्प राबवण्यात येणार

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर, तसेच ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या डिजीटलाईज्ड सिग्नल यंत्रणा नाही
मेक इन इंडियाच्या अंतर्गत सीबीटीसी प्रकल्प राबवण्यात येणार

एमयूटीपी-३ ए अंतर्गत अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा असलेली सीबीटीसी यंत्रणा आणि २३८ वातानुकूलित लोकल असे काही प्रकल्प पूर्णत्त्वास नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकल्पांच्या निधीसाठी दोन खासगी बँकासोबत चर्चा सुरु असून या खासगी बँकांकडून एकूण ७ हजार कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विशेष बाब म्हणजे सीबीटीसी प्रकल्पासाठी कोणत्याही परदेशी कंपनीची नियुक्ती न करता तो ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत हे प्रकल्प पूर्णत्त्वास नेण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर, तसेच ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या डिजीटलाईज्ड सिग्नल यंत्रणा नाही. मानवी पद्धतीने यंत्रणा हाताळताना रेल्वेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच अपघाताचा धोकाही अनेकवेळेस संभवतो. अशातच सातत्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने लोकलचे वेळापत्रक देखील बिघडते. या कारणांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अत्याधुनिक सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल) यंत्रणा उभारण्याचा निर्णय साधारण अडीच वर्षापूर्वी घेण्यात आला होता. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण, हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एमआरव्हीसीतर्फे प्रथम सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तिन्ही मार्गांवर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पसाठी सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे.

दरम्यान, एमयूटीपी ३ आणि ३ ए अंतर्गत एकूण २३८ वातानुकुलित लोकल प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि एमआरव्हीसीकडून प्रयत्न सुरू आहेत. वातानुकूलित लोकलसाठीही एकूण १८ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक (एआयआयबी) आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेने (एनडीबी) निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. सीबीटीसीसाठी ३,५०० कोटी रुपये आणि वातानुकूलित लोकलसाठी ३,५०० कोटी रुपये असे एकूण सात हजार कोटी रुपये टप्प्याटप्याने मिळणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in