साखळी बॉम्बस्फोट दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब नाही

रमेश धनुका आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठा समोर सोमवारी या खटल्याची सुनावणी झाली.
साखळी बॉम्बस्फोट दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब नाही
Published on

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या लोकल रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोटाला सोमवारी १६ वर्षे पूर्ण झाली. सत्र न्यायालयाने सात वर्षांपूर्वी दोषी आरोपीना फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र अद्यापही दोषींच्या फाशीवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. गेली सात वर्षे खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

रमेश धनुका आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठा समोर सोमवारी या खटल्याची सुनावणी झाली. मात्र कामाच्या व्यग्रतेमुळे हे प्रकरण ऐकण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागणार असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.

११ जुलै २००६च्या संध्याकाळी पश्चिम रेल्वेवर अवघ्या ११ मिनिटांत झालेल्या ७ साखळी स्फोटांत तब्बल २०९ निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर ७००हून अधिक लोक जखमी झाले होते. या दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाईम बॉम्ब ठेवत लोकलमधील फर्स्ट क्लासच्या डब्यांना लक्ष्य केले. ममोक्का न्यायालयाने ९ वर्षांनंतर पाच जणांना फाशिची शिक्षा ठोठावली होती.

logo
marathi.freepressjournal.in