जरांगे-पाटलांचा जीव वाचवण्याचे आव्हान!राजकीय बळी कुणाचा जाणार?

जीव वाचवण्यासाठी शासन दरबारी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत
जरांगे-पाटलांचा जीव वाचवण्याचे आव्हान!राजकीय बळी कुणाचा जाणार?

मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकालीन रिवाजाप्रमाणे प्रमाणे कुणबी जात प्रवर्गात सरसकट समाविष्ट करावे आणि ते करताना "वंशावळी"चा निकष बासनात गुंडाळावा या मागणीपासून मनोज जरांगे-पाटील तसूभरही हलणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने आता उपोषणावर ठाम असलेल्या जरांगे-पाटलांचे प्राण कसे वाचवायचे याप्रश्ना भोवती जालना जिल्ह्याची यंत्रणा गतिमान झाल्या आहेत.

या आंदोलनाच्या माध्यमातून शिंदे -फडणवीस-अजित पवार सरकारला विरोधी पक्षांचे सर्वच नेते, मराठा समाज यांना चांगलेच कोंडीत पकडले असले तरी टार्गेट मात्र देवेंद्र फडणवीसांना केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पातळ्यांवरुन जरांगे-पाटील यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण तर्कशुद्ध युक्तिवाद करीत जरांगे यांनी तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकालीन नोंदींच्या आधारे कुणबी प्रवर्ग दिला तरी ऊर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजाचे काय करायचे, या प्रश्नाचे उत्तरही सापडत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही निर्णय अंगलट येणार असल्याने "सरसकट सर्वांना" आणि "वंशावळीचा मुद्दा वगळणे” शक्य नसल्याने खालावत चाललेली जरांगे-पाटील यांची प्रकृती आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी शासन दरबारी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यासर्व परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेते देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय बळी देणार, की दिल्लीतील नेत्यांच्या आशीर्वादाने फडणवीस आता कोणाचा राजकीय बळी घेणार, याचीच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in