शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच! उद्धव ठाकरेंचा निर्धार

जे मी शिवतीर्थावर बोललो, ते आजही बोलणार आणि उद्याही बोलत राहणार. दसरा मेळाव्यात एका बाजूला गोळा केलेली माणसे होती
शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच! उद्धव ठाकरेंचा निर्धार
Published on

“शिवसेना संपवण्याचा ज्या वेळी प्रयत्न होतो, त्यावेळी शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून चारपटीने उभी राहते. चिन्ह गोठवले, नाव गोठवले; पण रक्त पेटवले. हे सळसळणारे रक्त समोरच्याला राजकारणात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करून दाखवणारच,” असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उरणमधून मशाल घेऊन आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

“जे मी शिवतीर्थावर बोललो, ते आजही बोलणार आणि उद्याही बोलत राहणार. दसरा मेळाव्यात एका बाजूला गोळा केलेली माणसे होती. तर दुसऱ्या बाजूला स्वत:हून आलेली तापलेल्या रक्ताची निष्ठावंत माणसे होती,” असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

“नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. घराघरात मशाल पोहोचविण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. अजूनही सदस्यनोंदणी सुरू ठेवा. ही लढाई कागदाची आहे, यात आपण हरता कामा नये,” असे आवाहन ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. “काहींना कॅनडा, ब्रिटनहून फोन आले. ते आश्चर्यकारक होते. ते म्हणाले की, आम्ही इथे बसून दसरा मेळावा बघत होतोच; पण आमचे तिकडचे मित्रही दसरा मेळावा बघत होते. आम्ही त्यांना ट्रान्सलेट करून सांगत होतो,” असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in