‘इंडिया’ची समन्वय समिती जाहीर वेणुगोपाल, शरद पवार, संजय राऊतांचा समावेश

शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले
File Photo
File PhotoANI

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरविणे तसेच आघाडीतील सर्व पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी इंडिया आघाडीतर्फे एकूण १४ जणांचा समावेश असलेली समन्वय समिती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समन्वय समितीसोबतच भाजपच्या सोशल मीडिया प्रचाराला तोंड देण्यासाठी सोशल मीडिया समिती आणि संशोधन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीची मुंबईत दोन दिवसीय बैठक होती. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आघाडीकडून विविध समित्यांची घोषणा झाली. यात प्रामुख्याने समन्वय समिती आणि निवडणूक रणनीती समिती महत्त्वाची मानली जात आहे. या समन्वय समितीबरोबरच १९ सदस्यांची प्रचार समिती जाहीर करण्यात आली असून काँग्रेसकडून गुरदीप सिंग सापल, शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून पी. सी. चाको, आरजेडीचे संजय यादव, जेडीयू संजय झा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्याशिवाय जेएमएमकडून चंपाई सोरेन, सपाकडून किरणोमय नंदा, आपकडून संजय सिंग, सीपीआयएम अरुण कुमार, सीपीआय बिनोय विश्वम, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसनेन मसुदी, आरएलडीचे शाहीद सिद्दिकी, आरएसपीचे एन. के. प्रेमाचंद्रन, एआयएफबीचे जी. देवराजन आणि सीपीआय(एमएल)कडून रवी राय यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

समन्वय समितीचे सदस्य

समन्वय समितीत के. सी. वेणुगोपाल, शरद पवार यांच्यासह जेएमएमचे हेमंत सोरेन, आरजेडीचे तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चड्डा, समाजवादी पक्षाचे जावेद अली खान, जेडीयूचे लल्लन सिंह, सीपीआयचे डी. राजा, ओमर अब्दुला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती आणि सीपीआयएमकडून लवकरच नाव निश्चित केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

सोशल मीडियासाठी १२ जणांची समिती

इंडिया आघाडीने शुक्रवारी सोशल मीडियाची जबाबदारी संभाळण्यासाठी एकूण १२ जणांची समिती जाहीर केली आहे. त्यात सुप्रिया श्रीनाटे, सुमित शर्मा, आशिष यादव, राजीव निगम, राघव चड्डा आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच मीडियासाठीही समिती जाहीर करण्यात आली असून त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, मनोज झा, शिवसेनेचे अरविंद सावंत, सपाचे आशिष यादव आदींचा समावेश करण्यात आला आहे.

संशोधनासाठीही समिती

इंडिया आघाडीने यावेळी संशोधनासाठीही समिती जाहीर केली आहे. अमिताभ दुबे, सुबोध मेहता, प्रियंका चतुर्वेदी, वंदना चव्हाण, के. सी. त्यागी, जासमिन शहा आदींचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in