सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास करण्यासाठी पालिका करणार तब्बल ३०० कोटी रुपये खर्च

सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास करण्यासाठी पालिका करणार तब्बल ३०० कोटी रुपये खर्च

पश्चिम उपनगरात असलेल्या सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ११ मजली नवीन इमारत बांधण्यात येणार असून ३०६ बेड्सचे अत्याधुनिक उपकरणासहित सिद्धार्थ रुग्णालय लवकरच उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयामुळे पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयावर पालिका तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करणार असून यासाठी निविदा मागवल्या आहेत.

केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह पूर्व-पश्चिम उपनगरात १६ रुग्णालये आहेत. मुंबई महानगर प्रदेशापासून देशाच्या कानाकोपऱ्यातून या रुग्णालयांमध्ये रुग्ण येत असतात. प्रमुख रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने उपनगरातील रुग्णालयांचा पुनर्विकास तसेच ती अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयाचाही समावेश आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी जोगेश्वरी ते मालाड पट्ट्यात पालिकेचे रुग्णालय नव्हते. त्या काळात सन १९९८ मध्ये गोरेगाव सिद्धार्थ नगर परिसरात सिद्धार्थ रुग्णालय बांधण्यात आले होते.

या सहा मजली १७२ खाटांच्या रुग्णालयाची वास्तू धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे २०१९ मध्ये हे रुग्णालय बंद करून २०२० मध्ये रुग्णालय इमारत पाडण्यात आली. गोरेगाव पश्चिम परिसर, मोतीलाल नगर, जवाहरनगर ही सर्वसामान्य मराठी कुटुंबीयांची वसाहत आहे. सिद्धार्थ रुग्णालय बंद झाल्याने येथील नागरिकांना जोगेश्वरी येथे बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय हाच सध्या आधार आहे. मात्र ही दोन्ही रुग्णालये काहीशी दूरवर असल्याने सिद्धार्थ रुग्णालय लवकरात लवकर बांधण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

गेल्या दोन वर्षांपासून पालिका प्रशासन कोरोनाच्या संकटाशी झुंजत असल्याने रुग्णालय उभारण्याच्या नियोजनात काहीसा विलंब झाला. मात्र रुग्णालय बंद केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी नवीन रुग्णालय उभारण्याचा मुहूर्त साधण्यात प्रशासनाला यश आले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू झाल्यानंतर पुढील तीन वर्षात नवीन रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयात पूर्वीप्रमाणेच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यात येणार असून सुमारे १३० नवीन खाटा वाढणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.

या सुविधा उपलब्ध होणार!

आयसीयू, रुग्ण दाखल विभाग

मेडिकल, पेडियाट्रिक, गायनॅक ओपीडी

एक्स रे, ईसीजी विभाग

ईएनटी, ऑप्थामॉलिजी

डेंटल, स्कीन ओपीडी

सीटी स्कॅन, डायलिसिस

पॅथॉलॉजी, वाहने पार्किंग

Related Stories

No stories found.