
भाजपला देशातील सर्व पक्ष संपवायचे आहेत. याचा अर्थ देश हुकूमशाहीकडे चाललाय. देशाची गुलामगिरीकडे वाटचाल होत असल्याचे हे लक्षण आहे. ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जशी साथ दिली तशीच साथ यापुढेही भक्कमपणे द्या. मग पहा, उद्या शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा वणवा पेटून उठेल आणि त्यात हे गद्दार आणि त्यांची गद्दारी रावणासारखी भस्म होईल. तुम्हीच या खोकासूराला भस्म करा’, असे जळजळीत आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात केले.
कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच घेण्यात आलेल्या शिवाजी पार्कवरील या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांचा महासागर उसळला होता. शिवसेनेतील अभूतपूर्व बंड, राज्यातील सत्तातरानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित केल्याने या दोन्ही मेळाव्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीत आयोजित करण्यात आला होता. एकाच वेळी हे दोन्ही दसरा मेळावे सुरू होते. त्यामुळे कोणत्या मेळाव्याला गर्दी होणार याचीही सर्वांना उत्सुकता होती.
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत भाजपसह बंडखोरांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की एक दिवस शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करून दाखवेन. आज मी तुम्हाला पुन्हा वचन देतो की पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेनच. आता ते अंगावर आलेच आहेत, तर त्यांना शिंगावर घ्यावेच लागेल. राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्या निवडणुका होतील त्या सर्व जिंकाव्याच लागतील’.
गद्दारांना गद्दारच म्हणणार
‘मी हिंदुत्व सोडल्याची हे टीका करतात. ही टीका करणाऱ्यांनी माझ्यासोबत एका मंचावर यावे आणि चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. गद्दारांना मी गद्दारच म्हणणार, असे सांगत त्यांनी शिंदे गटाचा बांडगुळ गट असाही उल्लेख केला.
खरे हिंदुत्व दाखवण्यासाठी माझ्यासमोर एका व्यासपीठावर या
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन मी हिंदुत्व सोडले, असा आरोप केला जातो. माझे त्यांना आव्हान आहे की माझ्यासोबत त्यांनी एका व्यासपीठावर यावे आणि चर्चा करावी. मी माझे हिंदुत्व तिथे सांगेन. उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे संभाजीनगर मी मुख्यमंत्री असताना केले. ज्या क्षणी प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवला त्याच्या दुसऱ्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी त्याला संमती दिली, असे ते म्हणाले.
पाकिस्तानात जाऊन वाढदिवसाचा केक खाणाऱ्यांना हिंदुत्व शिकवू नये
‘आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही. भाजपने तर मला हिंदुत्व शिकवूच नये. मी काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले म्हणता, तुमचे नेते पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर डोके टेकवून आले. नवाझ शरीफांच्या वाढदिवसाचे आमंत्रण नसताना पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले. आता सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाऊन मुसलमानांशी संवाद साधतात. मुसलमान तिथे म्हणाले की ते राष्ट्रपिता आहेत. भागवतांना राष्ट्रपती करा असे मी म्हणत होतो तेव्हा ऐकले नाही. ते मशिदीत गेले तर चालते, मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
भाजप गाईबद्दल बोलते,महागाईबद्दल गप्प का?
माझ्या मनात एकदा तर विचार आला की बीकेसीच्या मैदानात जाऊन यांचे हिंदुत्व ऐकावे. मग मला एक व्यंगचित्र आठवले. त्यात ईडीचे कार्यालय दाखविले होते. त्यावर लिहिले होते की येथे हिंदुत्व जागृत करून मिळेल, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. आता हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. यांचे हिंदुत्व गाईपुरतेच आहे, जरा महागाईवरही बोला. त्याबद्दल कुणी विचारले की हे हिंदुत्वाचा डोस पाजतात, अशी टीका त्यांनी केली.