
भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरात शनिवारी न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यात उद्घाटनाचे बेकायदेशीररीत्या फलक लावण्यात आल्याबद्दल न्यायमूर्ती ओक यांनी नाराजी व्यक्त केली होती. दैनिक 'नवशक्ति'ने त्याबद्दल सविस्तर बातमी देखील रविवारच्या अंकात दिली होती. त्याची दखल घेत बेकायदा बॅनरप्रकरणी महापालिका अधिकारी सुधाकर लेंढवे यांना २४ तासात खुलासा करण्याची नोटीस देण्यात आली असून दोन ठिकाणी फलक लावल्याबाबत राजाराम निनावेवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
परंतु शहरात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेकांनी फलक लावले होते तसेच न्यायालयासमोर अनधिकृत फलक लावणाऱ्या शिवसेना (शिंदे) गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही, याबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मीरा-भाईंदर शहरात अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रम साजरे केले जातात, अशा कार्यक्रमांचे फलक राजकिय कार्यकर्ते बिनधास्तपणे शहरात रस्त्यांवर, झाडावर व इलेक्ट्रिक खांबावर फलक लावतात. त्याविषयी तक्रारी केल्यानंतर देखील महापालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करते. अनेक वेळा किंवा वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर वा तक्रारी झाल्यानंतर एखादा गुन्हा दाखल केला जातो.
पालिकेने काही अनधिकृत फलकप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात व दुसरा काशीगाव पोलीस ठाण्यात राजाराम निनावेविरोधात गुन्हे दाखल केले. इतर ठिकाणी अनेकांनी फलक लावले होते, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत, अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त कल्पिता पिंपळे व सर्व संबंधित प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सत्य काम फाऊंडेशनचे ॲड. कृष्णा गुप्ता, गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टचे ॲड. इरबा कोनापुरे, फॉर फ्युचर इंडियाचे हर्षद ढगे बहुजन विकास आघाडीचे निलेश साहू, जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम आदींनी केली आहे.