मुख्यमंत्र्यांच्या भोवतालची गर्दी ठरणार सुरक्षा यंत्रणांना आव्हान

राज्‍यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या भोवतालची गर्दी ठरणार सुरक्षा यंत्रणांना आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. पोलीस यंत्रणा या धमकीची योग्‍य ती दखल घेऊन सुरक्षा उपाययोजना तर करणार आहेच; पण यातला एक कळीचा मुद्दा म्‍हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभोवती असणाऱ्या गर्दीचे करणार काय? हा मोठा प्रश्न आहे. सुरक्षा यंत्रणांसाठी ही गर्दीच मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

राज्‍यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले तरी त्‍यांच्यातला कार्यकर्ता काही दूर झाला नाही. एरवी कोणताही नेता मुख्यमंत्री बनल्‍यानंतर अनेक बंधने ही स्‍वाभाविकपणे येतातच. सुरक्षा यंत्रणांच्या कड्यामुळे पूर्वी अगदी जवळ असणारी माणसे मुख्यमंत्र्यांना सहजपणे भेटू शकत नाहीत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्‍याला अपवाद ठरले आहेत. ठाण्यातील त्यांचे निवासस्‍थान असो वा नंदनवन, वर्षा या ठिकाणी कायम गर्दी असते. काम घेऊन आलेले नागरिक, कार्यकर्ते तसेच शिंदे गटातील लोकप्रतिनिधी हे कायम या ठिकाणी असतात. इतकेच काय तर मंत्रालयातही मुख्यमंत्री शिंदे असतील तेव्हा सहाव्या मजल्‍यावर तुफान गर्दी असते. अनेकदा सहाव्या मजल्‍यावर पाय ठेवायलाही जागा नसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामे घेऊन आलेल्‍या सर्वसामान्य जनतेला भेटत असतात.

सहयाद्री शासकीय अतिथीगृह हे तसे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेले ठिकाण आहे. इथे सहजासहजी कोणाला प्रवेश नसतो. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे असल्‍यानंतर त्‍यांना भेटायला आलेल्‍यांची इथेही रीघ लागलेली असते. मुख्यमंत्री शिंदे हे सुरुवातीपासूनच जनतेत राहिलेले नेते आहेत. मुख्यमंत्री झालयानंतरही त्यांनी हाच शिरस्‍ता आतापर्यंत कायम ठेवला आहे. सर्वसामान्य, गरिब जनता ही अपेक्षेने आपल्‍याकडे येत असते. कोणाचे तरी आरोग्‍यविषयक मदतीचे काम असते. कोणाला शिक्षणासाठी,रोजगारासाठी मदत हवी असते. तर कोणाचे सामाजिक काम असते. आपण त्‍यांना नाही कसे म्‍हणायचे असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असतो. त्‍यामुळे त्‍यांच्या भोवतालची जनतेची गर्दी तर कमी होणार नाही हे तर निश्चित आहे. आता याच गर्दीतून पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेची वाट काढावी लागणार आहे. सुरक्षा यंत्रणांसमोर हेच मोठे आव्हान ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in