यात्री ॲपद्वारे प्रवाशांचे वर्तमान स्थान समजणार

ही सुविधा १३ जुलै २०२२ रोजी प्रवाशांच्या सेवेत आली. यासाठी प्रवाशाला यात्री ॲप डाउनलोड करावे लागते
यात्री ॲपद्वारे प्रवाशांचे वर्तमान स्थान समजणार
Published on

लोकल किती वेळेत पोहोचणार, त्याची सद्य:स्थितीची अचूक माहिती प्रवाशांना मध्य रेल्वेच्या यात्री मोबाइल ॲपद्वारे मिळत आहे. आता प्रवासी नेमका कुठे आहे आणि किती वेळात कुठे पोहोचेल याचीही थेट माहिती या ॲपद्वारे त्याचे नातेवाईक किंवा मित्र परिवाराला मिळू शकणार आहे. मध्य रेल्वेवरील लोकलची अचूक माहिती यात्री ॲपद्वारे प्रवाशांना देण्यासाठी सर्व लोकल गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

ही सुविधा १३ जुलै २०२२ रोजी प्रवाशांच्या सेवेत आली. यासाठी प्रवाशाला यात्री ॲप डाउनलोड करावे लागते. यामध्ये प्रवाशाला लोकलची सद्य:स्थिती समजते. लोकल स्थानकात किती वेळात पोहोचणार, तो कोणत्या स्थानकादरम्यान आहे याची अचूक माहिती मिळत असून पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यास त्याची माहितीही प्रवाशांना उपलब्ध होत आहे. याशिवाय मासिक, त्रैमासिक पास, वार्षिक पास यांचे दर, प्रवाशांना आकारला जाणारा दंड, रेल्वे स्थानकातील सुविधा, मेगाब्लॉक अशी विविध माहितीही त्यात उपलब्ध करण्यात आली आहे.

महिला प्रवाशांना सर्वाधिक फायदा

दरम्यान, आता प्रवाशाचे मित्र किंवा नातेवाईकांना त्याचे रेल्वे प्रवासातील वर्तमान स्थान समजावे, अशी नवी सुविधा ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. मोबाइलमध्ये यात्री ॲप असलेला प्रवासी आपण प्रवास करीत असलेले ठिकाण दुसऱ्याला मोबाइलवर पाठवू शकतो. मोबाइलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून वर्तमान स्थान पाहू शकतो. याचा सर्वाधिक फायदा महिला प्रवाशांना होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in