आमदार रमेश लटकेंच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का

आमदार रमेश लटकेंच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री दुबईत निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लटके हे सहपरिवार दुबईला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

आमदार रमेश लटकेंच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. रमेश लटके हे १९९७ साली प्रथम मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत.

रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदे यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी १९९७ ते २०१२ अशा सलग ३ वेळा नगरसवेक पद भूषवले. त्यानंतर २०१४ मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. आघाडीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या सुरेश शेट्टींना मतदारांनी १९९९ ते २००९ अशा सलग ३ वेळा निवडून दिले होते. त्यामुळे सुरेश शेट्टींचा दबदबा होता. काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी ही तिहेरी लढत होती. भाजपकडून सुनील यादव मैदानात होते. तर काँग्रेसकडून सुरेश शेट्टी. मात्र जनतेने लटकेंना कौल दिला. लटकेंनी भाजपच्या दिवंगत सुनील यादव यांचा ५ हजार ४७९ मतांनी पराभव केला होता. तर काँग्रेसची तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. यानंतर २०१९ च्या लढतीत लटके यांनी अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव करून १६ हजार ९६५ इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

Related Stories

No stories found.