मुंबई : मुंबईत स्वाईन फ्लूसारखे आजार उद्भवलेच, तर नागरिकांना चाचण्यांचे संच, औषधे परवडणाऱ्या दरात पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केली पाहिजेत, या मागणीवर सकारात्मक विचार केला जात आहे, अशी माहिती उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली.
पालिकेच्या रुग्णालयांत विविध सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे, असे त्यांनी पालिकेतील पत्रकार परिषदेत सांगितले. पालिकेसह अन्य रुग्णालयांत डाॅक्टरांना सुरक्षा मिळावी, याबाबत योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या नायर रुग्णालयातील तीन इमारतींमध्ये सुविधांअभावी तेथील महिला डाॅक्टरांना असुरक्षित वाटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याची दखल घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
पालिकेच्या शहर विभागातील रस्त्यांची कामे करण्यासाठी सुमारे नऊ टक्के इतक्या अधिक दराच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. सुमारे १५२ कोटी इतक्या अधिक खर्चाच्या या निविदांचे दर कमी करण्यासाठी पालिका कंत्राटदारांबरोबर वाटाघाटी करीत आहे. त्या अजूनही सुरूच आहेत, असे लोढा यांनी सांगितले.
खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक
मुंबईत आगामी गणेशोत्सव लक्षात घेता रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजविण्याची मागणी होत आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बैठक बोलावली आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.