जेजेतील वाद चिघळला ; निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संपाचा इशारा

जे. जे. रुग्णालय ही शिक्षण देणारी संस्था आहे. मात्र येथील निवासी डॉक्टरांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तसेच प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत
जेजेतील वाद चिघळला ; निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संपाचा इशारा

डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख आणि जेजे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर यांच्यातील संघर्ष गुरुवारी आणखी चिघळला. एकीकडे डॉ. लहाने यांच्याशी संबंधित ९ डॉक्टरांनी राजीनामा दिला असतानाच निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्ण सेवेवर परिणाम होऊन नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नेत्ररोग विभागातील सन्माननीय प्राध्यापकांना त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रावरील स्वाक्षऱ्या पडताळून घेण्याचे आवाहन जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केले आहे.

जे. जे. रुग्णालयातील ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. शुभम सोनी यांनी सांगितले की, डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख या हुकूमशाही पद्धतीने नेत्ररोग विभाग चालवत आहेत. ते राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे विविध टप्प्यांवर उल्लंघन करत आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी नेमलेल्या चौकशीत दोन सर्जनविरोधात केलेले आरोप सिद्ध झाले आहेत. तरीही हे दोन सर्जन या विभागातील मोतीबिंदूच्या सर्व शस्त्रक्रिया करत आहेत.

जे. जे. रुग्णालय ही शिक्षण देणारी संस्था आहे. मात्र येथील निवासी डॉक्टरांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तसेच प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. जर आमच्या मागण्या या पूर्ण झाल्या नाहीत तर आमच्याकडे संपाशिवाय पर्याय नाही. नाईलाजाने आम्हाला राज्यभर संपावर जाईल, परिणामी आपत्कालीन सेवा देणे बंद करावे लागेल, असा इशारा डॉ. शुभम सोनी दिला.

नेत्ररोग विभागातील अनेक निवासी डॉक्टरना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या डॉक्टरना शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव दिला जात नाही. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यांच्याविरोधात अश्लील भाषा वापरली जाते, असा आरोप डॉ. सोनी यांनी केला.

निलम गोऱ्हेचे चौकशीचे आदेश

विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. या आंदोलनामुळे रुग्ण सेवेवर मोठा परिणाम होत आहे. ज्येष्ठ डॉक्टर, प्राध्यापकांच्याविरोधात मार्डच्या डॉक्टरांनी केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी आयएएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्याचे आदेश त्यांनी दिले.

नऊ डॉक्टरांचे राजीनाम्याचे पत्र त्यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह गुरुवारी सकाळी मिळाले आहेत. त्यातील सात राजीनामा पत्रावर तारीख टाकलेली नाही. त्यामुळे त्यांच्या डिजीटल स्वाक्षरीची पडताळणी करून घेण्यास त्यांना सांगितले आहे.

डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय

जे. जे. कामकाजावर परिणाम

डॉक्टरांच्या आंदोलनामुळे गुरुवारी १४२३ रुग्णांनी ओपीडीला भेट दिली. केवळ ७२ रुग्णांना ॲॅडमीट करून घेतले तर ३० शस्त्रक्रिया झाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in