उष्माघाताचा प्राण्या पक्षावर परिणाम

 उष्माघाताचा प्राण्या पक्षावर परिणाम

रखरखीत ऊन आणि न भागणारी तहान अशी अवस्था सर्वांचीच झाली असताना. राज्यात यंदा उष्णतेच्या पाऱ्याने सर्वांनाच घाम फोडला आहे. हा उष्माघात फक्त मनुष्यांच्याच नव्हे तर पक्षी आणि प्राण्यांच्या जीवावरही बेतला आहे. ३० पक्ष्यांना उष्णाघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये उष्माघातामुळे ५० टक्के अधिक पक्ष्यांना परळ येथील बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, कबूतर, कोकिळा, कावळे आणि इतर पक्ष्यांसह १५० हून अधिक पक्ष्यांना डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा फटका बसला आहे.

मार्च मध्यापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य शहरांचे तापमान ३८ अंशावर गेले. वाढत्या उष्णतेमुळे धडधाकट आणि चालत्या-बोलत्या नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत असताना दुसऱ्या बाजूला आपले दुखणे न सांगू शकणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना याच्या सर्वाधिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. मागील काही दिवसांत वाढत्या तापमानाशी पक्ष्यांना जुळवून घेणे अशक्य झाल्याने उष्माघाताने तब्ब्ल ३० पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर १५० हून अधिक पक्षी-प्राणी डिहायड्रेशन आणि उष्माघाताशी झुंज देत असल्याचे बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी सांगितले. २०१९ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पक्षी-प्राण्यांना उष्माघाताचा सामना करावा लागत असल्याचे देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, उपचारासाठी येणाऱ्या पक्षी-प्राण्यांना आम्ही थंड तापमान केलेल्या पिंजऱ्यात ठेवतो. तर गरज पडल्यास बरे होण्यासाठी सलाईन देखील त्या पक्षी-प्राण्यांना लावण्यात येत असल्याचे डॉ. डांगर यांनी सांगितले. साधारण हे पक्षी बरे होण्यासाठी २ ते ३ दिवस लागतात, परंतु अनेकांना जीवही गमवावा लागतो.

उन्हाळा हा पक्ष्यांसोबत प्राण्यांसाठी विशेषत: भटक्या कुत्र्यांसाठी घातक आहे. निवारा नसलेले कुत्रे कडक उन्हात बाहेर फिरतात. उन्हात तहान भागवण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने आणि भटकून जनावरे अधिक चिडतात. घरांमध्ये पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना निवारा असला तरी त्यांची योग्य देखभाल घेतली गेली नाही तर उन्हाळ्यातील उष्णतेमुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. कुत्र्यांमध्ये गॅस्ट्रो आणि डिस्टेम्परचा त्रास आढळून येत आहे. तर वाढत्या तापमानामुळे हवेत उडत असताना पक्ष्यांना भोवळ येऊन ते जमिनीवर कोसळत आहेत. तर पाण्याअभावी आणि थकव्यामुळे बेशुद्धावस्थेत आढळत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in