
तेजस वाघमारे/मुंबई
प्रभादेवी परिसरात १९३० मध्ये उभारण्यात आलेले जुने दत्त मंदिर आहे. या मंदिरात दत्ताची मनमोहक संगमरवरी मूर्ती आहे. मूर्ती मागे केलेल्या चांदीच्या नक्षीकामाने अधिकच उठून दिसते. विविध राजकीय पक्षांचे नेते दर्शनासाठी या मंदिरात येतात. पुरेशा मदतीअभावी मंदिराची काही महत्त्वाची कामे रखडलेली असून त्याकामी सरकारने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा भाविकांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभादेवी परिसरात दत्त मंदिर हे वरळी गोपचार व भोये संस्थान यांचे आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मधुसूदन दामोदर रावते यांनी १९३० मध्ये केली असून त्यांची तिसरी पिढी सध्या या मंदिराची देखभाल करत आहे. हे मंदिर शासकीय विश्वस्तांच्या देखरेखीखाली असून ते धर्मदाय आयुक्तांच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे मंदिर ट्रस्ट दर महिन्याला मंदिराचा हिशोब शासकीय विश्वस्तांकडे सादर करत आहे. मंदिरापासून ट्रस्टला अधिक उत्पन्न मिळत नाही. जी काही देणगी मिळते त्यामधून मंदिराची दुरुस्ती, इलेक्ट्रिक बिल भरण्यातच जाते. त्यामुळे ट्रस्टला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
मंदिर पहाटे ५ वा. खुले होते : मंदिर पहाटे ५ वाजता खुले होते. दुपारी १२ वाजता बंद होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मंदिर खुले होते. सकाळ-सायंकाळी येथे आरती असते. ही कामे पुजारी नियमित करतात.
भक्तिमय कार्यक्रमाची रेलचेल
या मंदिरात दत्त जयंतीवेळी मोठा उत्सव करण्यात येतो. या दिवशी सकाळी मूर्तीवर अभिषेक केला जातो. त्यानंतर सायंकाळी कीर्तन असते. गुरुपौर्णिमेलाही असाच उत्सव साजरा करण्यात येतो. या ठिकाणी याआधी लहान मूर्ती होत्या. २००३ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी येथील मूर्ती मोठ्या बसविण्यात आल्या. आतापर्यंत भाविकांनी स्वखुशीने मंदिराच्या विकासाला हातभार लावला आहे. यातूनच मंदिरात मार्बल लावण्यात आले आहे.
मंदिरातील देवदेवता
मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजवीकडे गणपती, तर डावीकडे मारुतीची मूर्ती आहे.
तसेच लक्ष्मीनारायण, शीतला माता आणि शिवपर्वती देखील आहेत.
आठवड्यातून दोन वेळा कलावती देवीचे भजन असते, तर रविवारी बालसंगोपन कार्यक्रम चालतो.
मंदिराच्या छताला तडे
मंदिराच्या डागडुजीसाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यांनी मदत केल्यास येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. शंकराच्या पिंडीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची टाकी बसवायची आहे. मात्र मंदिराच्या छताला तडे गेले असल्याने टाकी बसविण्यास अडचण येत आहे. यासाठी मोठा खर्च आहे. यासाठी शासनाने मदत करावी.
- अजित रावते, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष
(उद्याच्या अंकात माझगावची वैकुंठ माता)